लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने शंभरी पार केली आहे. जिल्ह्यात गुरुवारी सहा नवीन रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या १०२ झाली. ९ जून रोजी मृत्यू झालेल्या एका ७० वर्षीय रुग्णाचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुळे आणखी एका मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, आज सहा जणांना रुग्णालयातून सुट्टीही देण्यात आली.

बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७० नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यातील ६४ अहवाल नकारात्मक, तर सहा अहवाल सकारात्मक आले आहेत. नवीन आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूरमधील भीमनगर येथील ६२ वर्षीय पुरुष, १९ वर्षीय तरुण, ६० वर्षीय महिला, मलकापूर तालुक्यातील धोंगर्डी येथील ७० वर्षीय वृद्ध, मलकापूर येथीलच ४५ व ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा कोविड रुग्णालयात मलकापूर तालुक्यातील धोंगर्डी येथील ७० वर्षीय रुग्णांला ९ जून दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री अतिदक्षता विभागात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या रुग्णाचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुळे मृतांची संख्या चार झाली.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७२ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी १२ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत एकूण १६७५ अहवाल नकारात्मक आले आहेत.

दरम्यान, बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील चार रुग्णांनी करोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. यामध्ये ६२ वर्षीय महिला, ४४ व २६ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. तसेच खामगाव येथील कोविड रुग्णालयातून दोन जणांना करोनातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. यामध्ये खामगाव शहरातील ३६ वर्षीय पुरुष व २७ वर्षीय महिलेचा समावेश आहे.