उत्तर प्रदेशातील अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी गुरुवारी वसईतून उत्तर प्रदेशातील प्रतापगडसाठी विशेष रेल्वेगाडी रवाना झाली. मजुरांना सोडण्यासाठी दोन ते तीन गाडय़ा सुटणार असल्याची चर्चा असल्याने वसई पश्चिमेतील सनसिटी मैदानात प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली होती. त्यामुळे मैदानात सामाजिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडाला होता

करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी टाळेबंदी सुरू आहे. मात्र या टाळेबंदीमुळे वसई-विरार शहरात मोठय़ा संख्येने विविध परराज्यातील मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी वसई रेल्वे स्थानकातून परराज्यात जाणाऱ्या गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. गुरुवारीही वसई स्थानकातून उत्तर प्रदेशातील प्रतापगड या ठिकाणी जाणाऱ्या मजुरांसाठी गाडी सोडण्यात आली.

दुपारच्या सुमारास गाडी सुटणार होती. घरी परतण्याची ओढ असल्याने मजुरांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. त्यातच काही मजुरांना वसई स्थानकातून दोन ते तीन गाडय़ा सुटणार असल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने त्यांनीही आपल्या सामानाच्या बॅगा घेऊन सनसिटी येथील मैदानात गर्दी केली होती. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनाही शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले की, वसईतून केवळ एकच गाडी सुटणार होती आणि ती गाडी ठरलेल्या नियमाप्रमाणे १६०० प्रवाशांना घेऊन रवाना झाली आहे.

सनसिटी येथील मैदानात मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झाल्याने सामाजिक अंतर राखण्याचे नियम पायदळी गेल्याचे चित्र वसईत दिसून आले.