मुंबई: मागील आठवडाभरात राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेच्याही वर गेली आहे. परिणामी उपचाराधीन रुग्णांची संख्या ही १८०० च्या घरात गेली आहे. बाधितांचे प्रमाणही जवळपास दीड टक्क्यांवर गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरात करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या १०० ते १५० दरम्यान स्थिर राहिली; परंतु एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून पुन्हा काही अंशी वाढ व्हायला सुरुवात झाली. मेच्या पहिल्या आठवडय़ात तर दैनंदिन रुग्णसंख्या दोनशेच्याही वर गेली.  मागील काही दिवसांत तर दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेच्या घरात गेली आहे.

राज्यभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून बाधितांचे प्रमाण आता दीड टक्के झाले आहे. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १८०० पेक्षाही जास्त झाली आहे. सध्या राज्यात १ हजार ८२८ रुग्ण उपचाराधीन असून यात सर्वाधिक १ हजार २११ रुग्ण हे मुंबईत आहेत. त्याखालोखाल पुण्यात ३०६, ठाण्यात १७८ रुग्ण आणि रायगडमध्ये ३४ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगड वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या वीसपेक्षाही कमी आहे.

करोनाची तीव्रता कमी

राज्यात एप्रिलपासून रुग्णसंख्या वाढत असली तरी वाढ तिसऱ्या लाटेच्या तुलनेत संथगतीने होत आहे. आता रुग्णसंख्येच्या आकडय़ापेक्षाही आपले लक्ष्य वेगळे असणे गरजेचे आहे. राज्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची आणि मृतांची संख्या, प्राणवायूची मागणी किती आहे यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच जनुकीय चाचण्यांचे प्रमाण आणि विषाणूचा नवीन प्रकार आढळत आहे का यावरही बारकाईने नजर ठेवणे महत्त्वाचे आहे. लसीकरणामुळे आणि सामूहिक प्रतिकारशक्तीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी त्याची तीव्रता फारशी नाही आहे; परंतु यापुढेही तीव्रता वाढू नये यासाठी सिनेमागृह, मॉल इत्यादी बंद ठिकाणी मुखपट्टीचा वापर करणे आणि लसीकरण वाढविणे यावर भर देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले.

ठाणे जिल्ह्यात ३० रुग्ण

ठाणे जिल्ह्यात रविवारी ३० करोना रुग्ण आढळून आले, तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.

६६ टक्के रुग्ण मुंबईत : राज्यात दैनंदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सुमारे ६६ टक्के रुग्ण हे मुंबईत आढळत आहेत. मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येने दोनशेचा टप्पा पार केला आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1800 covid cases in maharashtra covid 19 pandemic in maharashtra zws
First published on: 23-05-2022 at 03:55 IST