रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत नवीन ४० करोनाबाधित रूग्ण सापडल्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यात या महामारीचा प्रादूर्भाव झाल्यापासूनचा हा नवा उच्चांक आहे. पण यापैकी कामथे रूग्णालयात दाखल १४ जणांपैकी १३ जण चिपळूणच्या गोवळकोट परिसरातील एकाच इमारतीमधील आहेत, तर कळंबणी रूग्णालयातील १६ जणांपैकी ५ जण लोटे येथील एकाच कंपनीतील आहेत.

तसेच जिल्हा रुग्णालयात रविवारी सापडलेल्या कर्मचाऱ्यांच्या जवळच्या संपर्कातील आणखी तिघांना बाधा झाली आहे. यामध्येही परिचारिका, परिचर आणि नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा समावेश आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून एकूण करोनाबाधितांची संख्या ७५० झाली आहे.

नवीन ४० रुग्णांपैकी रत्नागिरी जिल्हा कोव्हीड रुग्णालय- १०, उपजिल्हा रुग्णालय कामथे-१४ आणि उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथील १६ रुग्ण आहेत. सक्रीय करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२८ आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४९४ झाली आहे. हे प्रमाण  ६५ टक्के आहे.

रत्नागिरी शहरातील ऑनाचणे, गोडावून स्टॉप, सन्मित्रनगर, समर्थनगर, रत्नागिरी, सीईओ बंगला, निवखोल, मच्छीमार्केट परिसर आणि तालुक्यातील कुर्धे ही सात क्षेत्र कोरोना ‘विषाणू बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात सध्या ५७ ‘प्रतिबंधित क्षेत्रे’ असून संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ६० संशयित रुग्ण दाखल आहेत. मुंबईसह इतर जिल्ह्यातून आलेले आणि गृह विलगीकरणाखाली असलेल्यांची संख्या १५ हजार ६११ आहे.