चंदनाच्या लाकडाची तस्करी करणारे राज्यातील मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणले असून त्यातील पाच जणांना काल अटक करण्यात आली. हे पाचही जण पारनेर तालुक्यातील आहेत. न्यायालयाने त्यांना पाच दिवस (दि. २०) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज दिला. या टोळीतील आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
संतोष यशवंत शिरोळे (वय २५), प्रतोष प्रकाश जुन्नरकर (वय २४), महेळ सीताराम तांबोळी (वय २९, तीघेही रा. आळकुटी), हरिभाऊ बजाबा झिंजाड (वय ४४ रा. गारखिंड, सध्या कामोठे, पनवेल रायगड) व अंखुश सुखदेव आवारी (वय ३२, रा. गारखिंड, सध्या वाशी, मुंबई) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी रात्री पुणे रस्त्यवारील वाडेगव्हाण शिवारात महेंद्र हॉटेलसमोर उभ्या असलेल्या एका कंटेनरवर छापा टाकून ७ हजार १८५ किलो (किंमत ७१ लाख ८५ हजार रु.) चंदनाचा साठा जप्त केला.
हा कंटेनर आळकुटी परिसरात राहणाऱ्या टोळीने मुंबईहून आणल्याची मााहिती मिळाली, त्यानुसार या टोळीस अटक करण्यात आली. या कारवाईत सहायक उपनिरीक्षक वाघमारे, मधुकर शिंदे, राकेश खेडकर, भाऊसाहेब आघाव, जाकीर शेख, योगेश गोसावी, दिगंबर कारखेले, योगेश घोडके,मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, युनूस शेख आदींनी भाग घेतला.