लोणावळ्याच्या भुशी डॅम येथे एका पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली आहे. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर शिवदुर्ग टीमला तरुणाचा मृतदेह सापडला आहे. सुरेंद्र तुकाराम कदम असं या तरुणाचं नाव असून तो ठाण्याचा रहिवासी होता. लोणावळा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र तुकाराम कदम त्याच्या तीन मित्रांसह लोणावळा येथे फिरण्यासाठी आला होता. लोणावळा फिरून झाल्यानंतर मौज मजा करण्यासाठी भुशी डॅम येथे गेले होते, आणि इथेच घात झाला. चौघेजण पाण्यात जाऊन मजा मस्ती करत होते. पण बाहेर येताना तिघेच बाहेर आले, सुरेंद्र बाहेर आलाच नाही. शोध घेतला असता सुरेंद्र कुठेच दिसत नव्हता.

यानंतर लोणावळा पोलिसांना माहिती देण्यात आली. शोधमोहिमेसाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला देखील पाचारण करण्यात आले. गुरुवारी सुरेंद्रचा शोध घेण्यात आला. परंतु काहीच हाती न लागल्याने शुक्रवारी पुन्हा शोध सुरु केला. अथक प्रयत्नानंतर शिवदुर्ग टीमला सुरेंद्रचा मृतदेह शोधण्यात यश आले. दोन दिवसांपूर्वीच भुशी डॅम येथे सेल्फीच्या मोहापायी एकाने जीव गमावला होता.

मुंबई व पुणे दोन्ही मोठ्या शहरांच्या मधे असल्यामुळे लोणावळ्याला पिकनिकसाठी जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यातही पावसाळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात येतात. शनिवार रविवारी तर होणाऱ्या गर्दीमुळे काही तासांची वाहतूक कोंडी होते. पर्यटक पाण्याचा अंदाज नसताना धरणामध्ये उड्या मारतात, अनेकजण मद्य प्राशन करून पाण्यात उतरतात तर काही जण पोहता येत नसतानाही पाण्यात उतरण्याचे धाडस करतात. पिकनिकला मजा करताना परिस्थितीचं भान न राहिल्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासन करत असते ज्याला पर्यटकांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.