विशेष व्याघ्र संरक्षण दलाची फोड केल्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पात एका जवानाला शिकाऱ्यांची गोळी अंगावर झेलावी लागली. अतिसंवेदनशील क्षेत्रात गस्त आणि आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांची मदत याकरिता विशेष व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने या दलाचे गठन गेले. मात्र, प्राधिकरणाच्या नियमालाच पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने हरताळ फासल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशभरातील अतिसंवेदनशील व्याघ्र प्रकल्पाकरिता विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात केले आहे. व्याघ्र प्रकल्पात शिकाऱ्यांचा धोका असणाऱ्या क्षेत्रात गस्त आणि आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास या दलाची मदत घेतली जाते. ११२ जवानांच्या या दलाची जबाबदारी सहाय्यक वनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर असते. ३०-३० च्या तीन तुकडय़ांमध्ये त्याची विभागणी करून त्या प्रत्येक तुकडीची जबाबदारी वनपरिक्षेत्र दर्जाच्या अधिकाऱ्यावर असते. याव्यतिरिक्त हे दल किंवा तुकडी फोडता येत नाही किंवा त्यांना इतर कामासाठी नियुक्त करता येत नाही. राज्य राखीव पोलीस दलाप्रमाणेच हे दल असते. राज्याच्या वनविभागातही धुळे, ठाणे आणि नागपूर येथे राज्य राखीव दल तैनात आहे. या दलाची फोड आजपर्यंत कुणी करू शकले नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पाने मात्र सारे नियम धाब्यावर बसवून विशेष व्याघ्र संरक्षण दलातील जवानांना ठिकठिकाणी नियुक्त केले.
पेंच प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या बोर, टिपेश्वर, उमरेड-कऱ्हांडला या ठिकाणी या दलातील जवानांची नियुक्ती करण्यात आली. या जवानांना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार जे प्रशिक्षण द्यायला हवे ते देण्यात आले नाही. या दलाला सहाय्यक वनसंरक्षक दर्जाचा अधिकारीही नाही आणि तुकडय़ांना वनपरिक्षेत्र दर्जाचा अधिकारी नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात यातील काही जवान नियुक्त करण्यात आले आहेत. व्याघ्र प्रकल्पात काही जवानांना वनमजुरांसोबत गस्तीवर पाठवले जाते. घटनेच्या दिवशीही सतीश शेंदरे दोन वनमजुरांसोबत नि:शस्त्र गस्तीवर होता आणि व्याघ्र प्रकल्पात शिरकाव केलेल्या सशस्त्र शिकाऱ्यांनी त्याच्यावर गोळीबार केला.
नियमानुसार दलाच्या प्रत्येक जवानाजवळ रायफल असणे आवश्यक आहे. त्यामुळे या जवानाची रायफल नेमकी गेली कुठे, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कार्यालयात तैनात असलेले दलाचे दोन जवान बंदुकीसह स्वत:चे छायाचित्रण करून घेताना दिसून आले. त्यामुळे पेंच प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून दलाची फोड केल्याचे स्पष्ट झाले आहे. ताडोबातही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने विशेष व्याघ्र संरक्षण दल दिले आहे. या ठिकाणीही थोडीफार अनियमितता असली तरी, त्या ठिकाणी दल आणि तुकडय़ा मात्र फोडण्यात आलेल्या नाहीत.
यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनीही हे दल एकसंघ असले पाहिजे, असा नियम असल्याचे सांगितले. याआधीही आम्हाला हे दल विविध कामांसाठी वापरण्याची परवानगी मागितली होती, पण आम्ही त्याला स्पष्ट नकार दिल्याचे ते म्हणाले.