सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या कचरा आगारासह स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी लागणाऱ्या केबल पाईपच्या साठ्याला भीषण आग लागण्याच्या दोन घटना घडल्या असून कचरा आगारातील आग आटोक्यात येण्यासाठी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर केबल पाईपचा संपूर्ण साठा जळून लाखोंची हानी झाली आहे.

तुळजापूर रस्त्यावर सुमारे ५४ एकर परिसरात महापालिकेचा कचरा आगार आहे. तेथे दरवर्षी उन्हाळ्यात वाढत्या उष्म्यामुळे आग लागते. लागलेली आग महिन्यापेक्षा जास्त दिवसांपर्यंत नियंत्रणात येत नाही. शुक्रवारी सायंकाळी लागलेली आग सुमारे ३० एकर परिसरातील कचऱ्याला लपेटली आहे. तुळजापूर रोडसह हगलूर, शेळगी, दहिटणे, भवानी पेठ मड्डी वस्ती आदी भागात दूरपर्यंत आगीचे उंच लोळ दिसत होते. विषारी आणि दुर्गधीसह पाच किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात विषारी आणि दुर्गंधीयुक्त धुरामुळे तेथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हेही वाचा – “शिवसेनेतील बंडाची माहिती अजित पवारांनाही होती, पण…”, शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा

महापालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या कचरा आगारामध्ये कचऱ्याचे विलगीकरण करून स्वतंत्र जैव खाण करण्याचे काम हाती घेतले होते. परंतु आतापर्यंत निम्मेही काम झाले नाही. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या सांगण्यानुसार कचरा आगारात दररोज चारशे टन कचरा साचतो. दिवसेंदिवस कचरा साचण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे कचरा विलगीकरणात अडचणी येतात. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन यंत्रणा कचरा आगाराकडे धावून गेली. २४ तासांत ३५ पेक्षा जास्त पाण्याचे बंब वापरून तसेच फोम रसायनाचा फवारा करूनही आग आटोक्यात येणे आवाक्याबाहेर झाल्याचे पालिका अग्निशमन विभागाचे अधीक्षक केदारनाथ आवटे यांनी सांगितले. ही आग आटोक्यात येण्यासाठी आता पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे कचरा आगाराला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले असताना तेथून जवळच भोगाव येथे उघड्या मैदानावर ठेवलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित केबर पाईपचा मोठा साठा शनिवारी दुपारी अचानकपणे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. हा केबल पाईपचा साठा यापूर्वी होम मैदानावर साठविण्यात आला होता. परंतु याच होम मैदानावर सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होण्यापूर्वी या पाईपचा साठा हलवून बार्शी रस्त्यावर भोगाव परिसरात एकाच ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आला होता. गेल्या वर्षी होम मैदानावरही या केबल पाईपाच्या साठ्याला मोठी आग लागली होती. सोलापुरात सध्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्यामुळे प्रचंड उष्मा जाणवत असतानाच या पाईप साठ्याला भीषण आग लागली.

हेही वाचा – सांगली : भाजपकडून अल्पसंख्यांकांना विश्वास देण्याचे काम

सायंकाळी उशिरापर्यंत २५ पाण्याचे बंब वापरून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न झाला. अगीवर ८० टक्के नियंत्रण मिळविता आल्याचे पालिका अग्निशामक दलाचे अधीक्षक केदारनाथ आवटे यांनी सांगितले. यात आर्थिक नुकसानीचा आकडा किती, हे स्पष्ट झाले नाही. कचरा आगार आणि स्मार्ट सिटी प्रकल्प योजनेंतर्गत लागणारे केबल पाईप साठ्याला मोठी आग लागल्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.