सोलापूर : बार्शी तालुक्यातील भालगावचे रहिवासी असलेले कृषी कर्मचारी अंगद सुरेश घुगे (वय ५५) यांच्या खूनप्रकरणात त्यांच्या मुलासह ग्रामसेविका असलेल्या पत्नीचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. त्यामुळे मुलापाठोपाठ पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. मात्र या खूनप्रकरणामागचे कारण स्पष्ट झाले नाही.

जयश्री अंगद घुगे (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे. तिचा मुलगा विशाल घुगे (वय २२) यास यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. या खून प्रकरणात आणखी कोणा-कोणाचा सहभाग होता, खून करण्यामागचे स्पष्ट कारण काय, याचा कुर्डूवाडी पोलीस कसून तपास करीत आहेत. मृत अंगद घुगे हे बार्शी विभागात कृषी सहायकपदावर सेवारत होते. त्यांची पत्नी जयश्री ही ग्रामसेविका आहे. गेल्या १४ जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या अंगद घुगे यांचा मृतदेह चौथ्या दिवशी माढा तालुक्यातील लऊळ  गावच्या शिवारात एका शेतालगत अर्धवट जळालेल्या आणि बेवारस स्थितीत आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर, तोंडावर, छातीवर, पाठीवर, दोन्ही हात व पायांवर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याच्या खुणाही आढळून आल्या होत्या. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आला असता त्यांच्या अंगावरील अर्धवट जळालेले कपडे तसेच जवळ सुमारे २५ हजारांची रोकडही अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडली होती. दुसऱ्या दिवशी मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने हाती घेतला असता संशयाची सुई त्यांच्या घराकडे वळली.

दरम्यान, बार्शीत सापडलेली एका खासगी मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली असता त्या मोटारीत रक्ताचे डाग दिसून आले होते. त्यानुसार या मोटारीशी संबंधित असलेला मृत अंगद घुगे यांचा मुलगा विशाल घुगे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली होती. त्याला अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असता पोलीस तपासात त्याची आई जयश्री हिचेही नाव संशयित म्हणून समोर आले. अंगद घुगे यांच्या खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग आढळून आल्याने पोलीसही चक्रावले. मात्र या खून प्रकरणामागचे निश्चित कारण अजून स्पष्ट झाले नाही. कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे पुढील तपास करीत आहेत.