scorecardresearch

महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात हल्ला: अजित पवार संतापून म्हणाले, “‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने…”

हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’च्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला

महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात हल्ला: अजित पवार संतापून म्हणाले, “‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने…”
अजित पवारांनी व्यक्त केला संताप (फोटो लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’च्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्याचा निषेध करताना पवार यांनी राज्य सरकारला आता ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी असंही म्हटलं आहे.

“मराठीभाषक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारने खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी,” असं आवाहनही पवारांनी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला केलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: जाळपोळ, डॉक्टरांवर हल्ले ते महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक… ६० लाख सदस्य असलेल्या ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’चा वादग्रस्त इतिहास

“कर्नाटक सरकारच्या पाठिंब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजुटीने सीमाभागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे आहेत,” असं म्हणत अजित पवारांनी सीमाभागातील मराठी बांधवांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

नक्की वाचा >> “पुढील २४ तासांमध्ये हे प्रकार थांबले नाहीत तर…”; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन झालेल्या हल्ल्यांवरुन पवारांचा थेट इशारा

“सत्तारुढ पक्षांनीही आपले कर्तव्य पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे.” अशा शब्दात अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 16:47 IST

संबंधित बातम्या