राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीप्रकरणी निवडणूक आयोगाने आज मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं आज (६ फेब्रुवारी) निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. या निकालानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाने लावलेला निकाल विनम्रपणे स्वीकारत असल्याचं अजित पवार म्हणाले.

“गेल्या वर्षी राजकीय घडामोडी राज्यात घडल्या. कोणत्याही पक्षासंदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची परंपरा आहे. त्याप्रकारे आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. त्यामध्ये आम्हीही आमचं म्हणणं मांडलं, इतरांनीही त्यांचं म्हणणं मांडलं. त्यावर अनेक तारखा पडल्या. सगळ्या वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिलं जातं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ, झेंडा सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, बाबा आत्रम, आदिती तटकरे यांच्याह ५० आमदारांनी घेतलेल्या निर्णयावर आज निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. हा निकाल मी विनम्रपणे स्वीकारतो. आम्ही निवडणूक आयोगाचेही आभार मानतो”, असं अजित पवार म्हणाले.

अदृश्य शक्तींनी मराठी माणसाचा पक्ष पळवला, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. त्यावर अजित पवार म्हणाले, “आम्ही मराठीच आहोत. त्यामुळे पक्ष पळवण्याचा प्रश्न येतोच कुठे? आम्ही जास्त टीका टिप्पणी करत नाहीत. काम करणारी माणसं आहोत आम्ही. केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रात आणणे. महाराष्ट्रात विकासाच्या करत प्रयत्नशील राहणे एवढं आमचं काम आहे.”