सांकेतिक नाव ‘कुत्ता गोळी’, मालेगाव शहरातील विद्यार्थी-युवक याच्या आहारी

प्रल्हाद बोरसे

मालेगाव : रुग्णांवर इलाज म्हणून वापरात असलेल्या ‘अल्प्राझोलम‘ या औषधी गोळ्यांचा नशेसाठी अवैधपणे होणारा वाढता वापर मालेगावात डोकेदुखी निर्माण करणारा ठरत आहे. ‘कुत्ता गोळी‘ या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उत्तेजक औषधाचा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून नशा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येत आहे.

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

अ‍ॅलोपॅथी उपचार पध्दतीत मानसिक विकार, निद्रानाश यासारख्या कारणांसाठी प्रामुख्याने ‘अल्प्राझोलम‘ हे औषध रुग्णांना दिले जाते. गोळ्यांच्या स्वरुपातील या औषधाचे दरही तुलनेने स्वस्त आहे. हे औषध अधिकृत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिले जाऊ  शकत नाही. परंतु, अनेकदा या नियमाकडे डोळेझाक करून औषध दुकानदारांकडून बेकायदेशीरपणे आणि चढय़ा दरात ते विकले जात आहे. अवैध पध्दतीने काळ्याबाजारात या औषधांची विक्री के ली जात असून त्यात काही परप्रातिय टोळ्या सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वितरक, दुकानदार, तस्कर, वाहतूकदार असे घटक या साखळीत अंतर्भूत असल्याचे सांगण्यात येते.

‘कुत्ता गोळी‘ची विक्री होण्या संदर्भातील तक्रारी १० वर्षांपासून सुरू असून गेल्या चार-पाच वर्षांपासून या औषध विक्रीतील उलाढाल लक्षणीयरित्या वाढली आहे. पोलीस आणि अन्न-औषध प्रशासनाने या प्रकरणी काही जणांवर यापूर्वी वेळोवेळी फौजदारी कारवाई केली आहे. तरीदेखील पोलिसांची नजर चुकवत शहरात हा गोरखधंदा सुरुच असल्याचे सांगितले जाते.  मध्यंतरी मालेगाव पोलिसांनी गुजरातमधील एका व्यापाऱ्याला तसेच त्याच्या मालेगावमधील हस्तकांना याच संशयावरुन अटक केली होती.

प्रमाणापेक्षा जास्त मात्रा घेतल्यास या औषधाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. या औषधाच्या सेवनामुळे मेंदुवरील नियंत्रण सुटते. बेधुंद झालेली व्यक्ती एखादे गैरकृत्य करण्यास उद्युक्त होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कुत्ता गोळीच्या वाढत्या खपाचा संबंध गेल्या काही वर्षांपासून शहरातील गुन्हेगारीच्या वर जाणाऱ्या आलेखाशी जोडला जात आहे.

या औषधाच्या अंमलाखालील तरुणांकडून शहरातील नावाजलेल्या भारत व्यायाम शाळेचे अध्यक्ष मंगेश बिरारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न नुकताच झाला. सुदैवाने ते यातून वाचले. महिलांचा विनयभंग, रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे भ्रमणध्वनी हिसकावून पलायन करणे, महिलांचे दागिने हिसकावणे, दुचाकी चोरी अशी गुन्हेगारी कृत्य हे नशेखोर करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

‘कुत्ता गोळी‘चे सेवन करुन नशा करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने मालेगावकरांचा त्रास वाढत आहे. तसेच यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत असून भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. या औषधाच्या अवैध विक्रीला पायबंद घालावा म्हणून यापूर्वी अनेकदा पाठपुरावा केला तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना अमलात आणल्या जात नाहीत. मादक पदार्थाच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरात एक पूर्णवेळ निरीक्षक नियुक्त करावा, ही साधी मागणीदेखील दुर्लक्षित ठेवण्यात आली आहे.

– रामदास बोरसे (अध्यक्ष, सार्वजनिक नागरी समिती, मालेगाव)