ज्या भागात कापूस पिकतो, त्याच भागात वस्त्रोद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने स्वीकारल्यानंतर अमरावतीत वस्त्र निर्मितीच्या क्षेत्रात वेगवान घडामोडी घडत असून मोठया वस्त्रोद्योग उद्यानाची निर्मिती या ठिकाणी होत आहे. येत्या काळात देशातील सर्वात मोठे ‘गारमेट हब’ म्हणून अमरावतीचे नाव होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीतील रेमंड समूहाच्या लीनन यार्न आणि फॅब्रिक उत्पादन  केंद्राचा शुभारंभ रविवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पणन मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, यशोमती ठाकूर, डॉ. अनिल बोंडे, रमेश बुंदिले, रवि राणा, माजी खासदार विजय दर्डा आदी उपस्थित होते.  जोपर्यंत शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण होणार नाहीत, तोपर्यंत शेतमालाला योग्य दर मिळणार नाही. बाजार व्यवस्थेवर आज मध्यस्थाचे नियंत्रण आहे. ते शेतकऱ्यांच्या हाती गेल्यावरच बदल घडून येईल. अमरावती विभागात शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आज अमरावतीत कापड निर्मितीला सुरुवात झाली. दुसरीकडे येथील व्यापारी तयार कपडय़ांचे मोठे मार्केट विकसित करीत आहेत. यातून मूल्यवर्धन होणार आहे. नांदगावपेठमध्ये एमआयडीसीची जागा होती, पण उद्योग नव्हते. गेल्या तीन वर्षांमध्ये या ठिकाणी आठ मोठे उद्योग उभारले जात आहेत. ३० मोठय़ा प्रकल्पांनी जागा घेतली आहे. ८९ लघु आणि मध्यम उद्योगांनी उद्योग उभारणीचे काम सुरू केले आहे. यातून सुमारे ३० हजार लोकांना रोजगार मिळू शकेल. यात भूमिपुत्रांना संधी मिळावी, यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यापीठासह शैक्षणिक संस्थांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. या भागात जागा घेणाऱ्या उद्योगांनी पाच वर्षांमध्ये उत्पादन सुरू केल्यास अशा उद्योगांसाठी प्रोत्साहनपर सवलती देण्यात येतील. येथून कापड आणि तयार कपडय़ांची निर्यात होऊ शकेल. त्यासाठी ड्राय पोर्टदेखील तयार करता येऊ शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले, सध्या शेतकऱ्यांसाठी कठीण काळ आहे. शेतकऱ्यांना गर्तेतून बाहेर काढण्यासाठी पीक रचनेत बदल करणे गरजेचे आहे. शेतमालाचे मूल्यवर्धन ही बाब आता महत्वाची ठरू लागली आहे. शेतकऱ्यांना त्यासाठी मदत करण्याची गरज आहे. अमरावती हे वस्त्रोद्योगाचे केंद्र होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या भागातून निर्यात वाढल्यानंतर ड्राय पोर्ट सुरू करता येऊ शकेल. आम्ही उद्योगवाढीला प्रोत्साहन देतो, याचा अर्थ आमचे उद्योगपतींवर प्रेम आहे, असे होत नाही. या भागातील भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे.

सुभाष देसाई म्हणाले, या भागात वस्त्रोद्योग उद्यान विकसित होत आहे. सुमारे ९६८ हेक्टर जागा त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. पण, जागा कमी पडल्यास आणखी तीन हजार हेक्टरवर त्याचे नियोजन केले जाईल. यावेळी रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनीही मनोगत व्यक्त केले. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार घरांचा बृहत आराखडा तयार करण्यात आला असून तीन हजार ५०० विद्यार्थी क्षमता असलेले सिंघानिया स्कूल या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.