नगर लोकसभा निवडणुकीच्या १६ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीस स्थगिती मागणारा व निकाल जाहीर करण्यास मनाई मागणारा दावा निवडणुकीतील भारतीय नवजवान पक्षाचे उमेदवार अॅड. शिवाजीराव डमाळे यांनी शुक्रवारी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दाखल केला. सीपीसी कलम २६ अन्वये दावा दाखल केला आहे.
निवडणूक आयोगासह नगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील सर्वच १३ उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले आहे. प्रतिवादींनी अनेक वेळा आचारसंहिता भंग केल्याने निवडणूक बेकायदा ठरवली जावी, अशीही मागणी दाव्यात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव राजळे यांनी प्रचारात ‘बॅलेट मशीन नमुना’ बेकायदा तयार करून सरकारी कागदपत्रात फेरबदल केला, त्यामुळे मतदारांत दिशाभूल झाली. मतदान केंद्राच्या बूथवर लावलेल्या नमुना मतपत्रिकेवर आपल्या नावापुढे रद्दचा (कॅन्सल) शिक्का मारल्याने आपल्याला मतदान करणे मतदारांनी टाळले, त्याबाबत आपण मतदानाच्या दिवशीच भूषणनगर येथील मतदान केंद्र क्र. २३३च्या प्रमुखांकडे अर्ज दिला आहे, जाहीर प्रचार दि. १५ एप्रिलच्या सायंकाळी ५ वाजता संपल्यावरही प्रतिवादींनी नंतरचे दोन दिवस वृत्तपत्रांत जाहिराती व पेड न्यूज देऊन आचारसंहिता भंग केला. भरारी पथकाने अनेक ठिकाणी बेहिशेबी पैसे पकडले तरीही प्रतिवादींचे पैसे मतदारांपर्यंत पोहोचले. दिलीप गांधी यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी सभा घेतली, त्यासाठी ५ हजार रुपये देऊन गाडय़ा आणल्या होत्या, सभेला तीन लाख लोक जमा झाले, तरीही सभेचा खर्च ७ ते ८ लाख रुपये दाखवला गेला आहे. त्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिले नाही. अनेक ठिकाणी मतदारांची नावे मतदारयादीत नव्हती व बोगस मतदानही झाले, असे दाव्यात म्हटले आहे.