आपल्या मातीत, आपल्या माणसांच्या गर्दीत ज्यांचे हारतुऱ्यांनी स्वागत व्हायचे होते, त्या गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घ्यायचे, या कल्पनेनेच बेभान झालेल्या हजारोंच्या जनसमुदायाने ‘अमर रहे अमर रहे.. गोपीनाथ मुंडे अमर रहे’ अशा आर्त घोषणा देत परळीतील वैजनाथ साखर कारखान्याचा परिसर हेलावून सोडला. मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा यांनीच त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. मुंडे यांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी व्हावी, या मागणीचा स्वर जमावातून इतका टिपेला गेला की मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक, हर्षवर्धन पाटील, छगन भुजबळ या मंत्र्यांची अडवणूक सुरू झाल्याने हतबल पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. या प्रकाराने लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह हे केंद्रीय नेते अंत्यविधीला न येताच परतले.
बेभान जमावापायी सुरक्षेचे तीनतेरा
सुरक्षाव्यवस्थेतील अनेक त्रुटींमुळे झालेली दगडफेक, लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी झालेली अलोटी गर्दी यामुळे एका बाजूला हुंदका आणि दुसऱ्या बाजूला जमावाला शांत करण्याची कसरत पंकजा मुंडे यांना करावी लागली. इतका अलोट जमाव येईल आणि तो इतका बेभान बनेल, अशी कल्पनाच यंत्रणेला न आल्याने या अंत्यविधीप्रसंगी सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे दिसत होते. जमावाने मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री तसेच प्रसिद्धी माध्यमांनाही कोंडीत गाठून सीबीआय चौकशीची मागणी रेटून धरली होती.
इतके मोठे नेते येणार या दृष्टीने आवश्यक ते नियोजन नव्हते आणि हजारो लोक अंत्यदर्शनाला लोटल्यावर त्यांना दर्शन नेमके कसे घेऊ द्यावे, याचेही नियोजन नसल्याने गर्दीला आवर घालताना पोलिसांच्या नाकी नऊ येत होते. पंकजा मुंडे यांनी त्याही स्थितीत माइक हातात घेऊन लोकांना शांत राहाण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केल्यावर जमाव काही काळ शांत झाला. पण बडे नेते येऊ लागताच अपघाताबद्दल शंका व्यक्त करीत सीबीआय चौकशीची मागणी जमावातून सुरू झाली आणि मग सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले.