अवघ्या २० रुपयांच्या वादातून पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाचा जीव घेतल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. भाड्याचे पूर्ण पैसे का नाहीत? यावरून प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात वाद सुरु झाला. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये प्रवासी गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. शनिवारी गणेशपेठेत झालेली ही घटना उघडकीस आली आहे. तानाजी धोंडीराम कोरके असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अतुल इश्वर हराळे आणि रोहन गोडसे अशी या दोघांची नावे आहेत. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

तानाजी कोरके यांनी शनिवारी पुणे स्टेशनपासून रविवार पेठेकडे जाण्यासाठी अतुल उर्फ इश्वर हराळेची रिक्षा ठरवली. गणेश पेठच्या दरम्यान ते रिक्षातून उतरले. रिक्षाचे भाडे ४० रुपये झाले मात्र तानाजी यांच्याकडे २० रुपयेच होते. उरलेले २० रुपये का नाहीत यावरून रिक्षावाला आणि प्रवासी या दोघांमध्ये वाद सुरु झाला.

अतुल हराळेने त्याचा साथीदार रोहनच्या मदतीने कोरकेंना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात तानाजी कोरके यांची शुद्ध हरपली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कोरके यांना अतुल हराळेच्याच रिक्षातून ससून रूग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तानाजी कोरके मुळचे लातूरचे रहिवासी होते गेल्या ८ वर्षांपासून ते पुण्यात राहात होते अशीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांना अतुल आणि रोहन या दोघांचा संशय आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ज्यांनी कोरकेंना मारहाण केली ते अतुल आणि रोहन असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या.