पक्ष्यांच्या विविधतेने संपन्न अमरावती जिल्ह्य़ात प्रथमच ‘छोटा चिखल्या’ पक्षी आढळून आला आहे. या पक्षाच्या नोंदीमुळे वन्यजीव अभ्यासकात आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.
छोटा चिखल्या या पक्ष्याला इंग्रजी भाषेत ‘लेस्सर सॅण्ड प्लोवर’ म्हणतात. शास्त्रीय भाषेत त्याची ‘काराड्रीअस मंगोलस’ म्हणून ओळखत असून, हा ‘क्यार्याड्रीडी’ कुळातील पक्षी आहे. ‘लावा’ किंवा ‘बटेर’ पक्ष्याएवढा असून याचा आकार १९ ते २१ से.मी. असतो.
पाणथळ जागेवरील चिखलाणी तसेच समुद्र किनारपट्टीलगत हा पक्षी आढळून येतो. कपाळ आणि भूवईचा रंग पांढरट असून, चोचेखालचा रंग पूर्ण पांढरा तसेच पोटाखालचा रंगही पांढरा असतो. पाय आणि चोच काळ्या रंगाचे असतात. खांद्याजवळील राखी-तपकिरी रंग ही याची खासियत आहे.
 अमरावती जिल्हा पक्ष्यांच्या विविधतेने संपन्न असून अनेक पक्षीनिरीक्षक सकाळीच छत्री तलाव, वडाळी तलाव, पोहरा तलाव, मालखेड तलाव येथे पक्षीनिरीक्षणाला जातात. वन्यजीव छायाचित्रकारांच्या देखील पक्षी हा अतिशिय आवडता विषय आहे. अमरावती येथील वन्यजीव छायाचित्रकार मनोज बिंड व प्रफुल्ल गावंडे पाटील आणि वन्यजीव अभ्यासक क्रिष्णा खान यांना सिभोरा तलाव येथे हा पक्षी २३ मे २०१५ रोजी आढळून आला. यापूर्वी नागपूर येथे याची नोंद झालेली आहे.

‘छोटा चिखल्या’ची नोंद अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विदर्भात पक्ष्यांची विविधता समृद्ध आहे. पक्षीनिरीक्षक तसेच वन्यजीव छायाचित्रकारांनी पक्ष्यांच्या नियमितपणे नोंदी व त्यांची निरीक्षणे आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवावीत. संशोधन व संवर्धन करण्याकरिता तसेच पुढील पिढीला ही माहिती आपल्याला देता येईल.
-यादव तरटे, वन्यजीव अभ्यासक.