scorecardresearch

Premium

ठाकरे सरकारने चौकातलं भाषण राज्यपालांकडे पाठवलं – देवेंद्र फडणवीस

राज्यपालांना नाकारण्यात आलेल्या विमान प्रवासावरुनही हल्लाबोल

Devendra-Fadanvis-1
(संग्रहित छायाचित्र)

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरु असून राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांच्या १२ पानांच्या भाषणात मला कुठेही यशोगाथा दिसत नाही, तर वेदना आणि व्यथा दिसतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यपालांना नाकारण्यात आलेल्या विमान प्रवासावरुनही टीका केली.

“राज्यपाल तिथे गेले, विमानात इंधन भरलेलं होतं. मग परवानगी नसताना इंधन कसं भरलं? परवानगी नसताना त्यांना बोर्डिंग पास कसा मिळाला? ते आतमध्ये जाऊन विमानात कसे बसले? राज्यपाल आणि आपल्यात मतभेद असतील पण मनाचा इतका कोटेपणा दाखवू नये. राज्यपाल व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नाही तर पद महत्वाचं असतं. आपल्या प्रोटोकॉलमध्ये राज्यपाल पहिल्या क्रमांकावर आहेत. मुख्यमंत्री आणि राज्यपाला यांच्यात कोणाला विमान द्यायचं अशी वेळ आली तर राज्यापलांना द्यायचं असतं,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

ncp mla sumantai patil on indefinite hunger strike in front of collector office over water issue
सांगली: टेंभूच्या पाण्यासाठी आमदार सुमनताई पाटलांचे उपोषण
manipur conflict jp nadda
Manipur Conflict: मणिपूर भाजपचे हिंसाचाराबद्दल नड्डा यांना पत्र
Vanchit Aghadi march sangli
सांगली : कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा
Jitendra Awhad On obc reservation
“मागासवर्गीय जागे व्हा!”, राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे जितेंद्र आव्हाडांचं आवाहन; म्हणाले, “आरक्षण समाप्ती…”

“२१ फेब्रुवारीचं फेसबुक लाईव्ह सर्वात्कृष्ट होतं”; उद्धव ठाकरेंसमोर फडणवीस कौतुक करत म्हणाले…

‘अशाप्रकारे रोज आपण ज्या राज्यपालांना अपमानित करता आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आलाय याचं समाधान वाटतं. ज्यावेळी हे भाषण ऐकलं तेव्हा माझ्या मनात प्रश्न पडला. साहित्यात अनेक प्रकार असतात पण राज्यपालांचं भाषण कोणत्या श्रेणीत मोडतं याचा अभ्यास केला. तेव्हा लक्षात आलं १२ पानांच्या भाषणात कुठेही यशोगाथा दिसत नाही, वेदना आणि व्यथाच दिसतात. आपली बाजू मांडत असताना त्यात काही आकडेवारी मांडली पाहिजे, पण कुठेच दिसत नाही. जसं आपण चौकात भाषण करतो तसंच भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलं,” अशी टीका फडणवीसांनी केली.

“आपल्या अपयशाचा लेखोजोखा समोर येईल अशी भीती सरकारला वाटत आहे. जम्बो रुग्णालयाचा किती कंत्राटदारांना लाभ झाला, कोणाची घरं भरली गेली याचाही लेखाजोखा दिला असता तर अजून चांगलं वाटलं असतं,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

आणखी वाचा- “जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा, ३०९०० जणांचे प्राण वाचवता आले असते जर…”; फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

“सर्वात आधी माझं कुटुंब माझी जबाबदारी…आता मीच जबाबदार..म्हणजे सरकारची काहीच जबाबदारी नाही. सरकार हात झटकून मोकळं आहे. आपली पाठ थोपटण्यासाठी तयार आहे. बाकी सगळी जबाबदारी तुम्ही घ्या. मागच्या वेळी सुधीर मुनगंटीवार बोलले ना…सगळी जबाबदारी तुमची आणि उरलेली मोदींची. आमची काही जबाबदरीच नाही अशा प्रकारची अवस्था आपल्याला पहायला मिळत आहे. राज्यपालांचं भाषण म्हणजे पुढील एक वर्षात काय करणार आहोत, आमची दिशा काय आहे यासंदर्भात असलं पाहिजे. पण त्यात काहीच पहायला मिळत नाही. फक्त शब्दांचे रत्न लावून लोककल्याण साधता येत नाही,” अशी टीका फडणवीसांनी केली.

आणखी वाचा- फडणवीस म्हणतात, “हे सरकार मला नारायण भंडारीसारखं वाटतंय!”

“यमक जुळवणारी भाषा यशाचं गमक असू शकत नाही हे मला राज्य सरकारला सांगायचं आहे,” असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. “देशात झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहे. कशाबद्दल पाठ थोपटून घेत आहात? डॉक्टरचा सल्ला घेतो की कम्पाऊंडरचा हा प्रश्न मला खरोखरच या सरकारला विचारावासा वाटतो. देशाच्या ४६ टक्के सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात आहेत,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“रुग्णसंख्या जी वाढत आहे की त्यामागे इतर काय आहे असे प्रश्न निर्माण होतात. अमरावतीत जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने चाचणी केंद्रावरुन रिपोर्ट कसा आहे याचा फोन आल्याचं सांगितलं होतं. मग कशाच्या आधारे अमरावतीत लॉकडाउन केला? लॉकडाउन केलं त्या काळात निदान, व्यवस्था नव्हती. पण आज मनात आलं की लॉकडाउन केलं जात आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली.

आणखी वाचा- शिवजयंती व धार्मिकस्थळं यातूनच करोना वाढतो का? – फडणवीस

“कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने ज्याप्रकारे हाताळणी केली असती तर ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी असते, तर ३० हजार ९०० मृत्यू महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं? आम्ही सगळ्यात मोठं रुग्णालय विक्रमी वेळेत बांधल्याचं सांगण्यात आलं…पण यात विक्रमी भ्रष्टाचारदेखील झाला. निविदा न मागवता गाद्या, उशा, सलाइन यांवर ६० लाख रुपये खर्च केले. १२०० रुपयांचं थर्मामीटर ६५०० रुपयांत खरेदी केली. २ लाखांच्या बेडशीटसाठी ८.५ लाख भांड दिलं. पंख्याचं ९० दिवसांचं भाडं ९ हजार दिलं. हजार प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं चार लाख रुपये. लाकडाचे १५० टेबलचं भाडं सहा लाख ७५ हजार रुपये….काय काय घोटाळे सांगायचे. जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळ्याची पुस्तिका तयार केली असून मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे. हा रेकॉर्ड वेळेतील भ्रष्टाचार आहे,” असा आरोप फडणवीसांनी केला. मृतदेहांच्या बॅग, पीपीई किटचाही घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केली. घोटाळा समोर आणला तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी या शब्दाचा अर्थ कळेल अशी टीका त्यांनी केली.

कोविडच्या काळात माहिती एकत्रित करण्याचं काम रस्ते विकास महामंडळ करत असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. फडणवीसांनी यावेळी यवतमाळमध्ये लहान मुलांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याच्या आणि भंडारात रुग्णालयात लागलेल्या आगीचा उल्लेख करत सरकारमध्ये फक्त फेसबुक लाईव्ह सुरु असल्याची टीका केली.

“२१ फेब्रुवारीचं लाइव्ह हे सर्वात्कृष्ट होतं. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का विचारलं…कारण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे. हेच आम्ही सांगत आहोत ? या महाराष्ट्रातील जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. हेच आम्हाला सांगायचं आहे की, तो आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे,” अशी टीका फडणवीसांनी केली.

भाषणातील इतर मुद्दे –
– ९० टक्के लाभार्थी फायदा मिळत असताना DBT बंद केली जात आहे. केवळ मलिदा खाण्यासाठी चांगल्या योजना बंद केल्या जात आहे.
– आदिवासी खावटी योजनेचा सुद्धा गेल्या वर्षभरापासून फायदा दिला जात नाही, काही खास लोकांना फायदा मिळावा यासाठी १ वर्ष हा साधा विलंब समजायचा का. समिती म्हणते थेट रोख रक्कम द्या. मग का देत नाही.
– संत नामदेव महाराज यांचा सरकारला विसर पडला. कोणतेही कार्यक्रम सरकारने घेतले नाही. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावता महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई यांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. सरकारची वारकरी संप्रदायावर नाराजी का? शिवजयंती आणि मंदिर यामुळेच कोरोना वाढतो का?.
– शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरु आहे. अमरावती, अकोला या विभागात ८८ ते १०० टक्के नुकसान बोन्डअळीमुळे झाले आहे. मराठवाड्यात अवकाळीने नुकसान पण मदत मिळत नाही. एकीकडे मदत नाही आणि दुसरीकडे वीज कापली जात आहे.
– विकेल ते पिकेल’ मध्ये झाले काहीच नाही. नियोजन १३४५ मूल्यसाखळीचे, अजून साधा स्टाफ दिला नाही. केवळ २९ ला मंजुरी ५ टक्के सुद्धा अंमलबजावणी नाही.- जलयुक्त शिवारला पर्याय दिला. पण घोषणा केल्यावर ११ महिने मंत्रिमंडळात निर्णय नाही. किमान मुख्यमंत्र्यांचे नाव दिले तर ती तर योजना नीट राबवा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेल्या योजना राबविताना तर नीट भान ठेवा.
– कंत्राट देण्याच्या दबावातून २ कुलगुरू राजीनामे देतात. किती गंभीर आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फोन कोण टॅप करते आहे, हेही सांगा. मंत्री स्वतः ट्विट करतात आणि सकाळी डिलीट करतात.
– पूजा चव्हाण प्रकरणात जितके पुरावे आहेत, तितके पुरावे कोणत्या प्रकरणात नसतील. तक्रार नाही म्हणून केस होत नाही असे कोण सांगते? खटला चालतो तेव्हा तो राज्य विरुद्ध आरोपी असा असतो.
– मेहबूब शेख केवळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून कारवाई नाही. स्वतः डीसीपी बचावासाठी पुढे येतात. इतका पोलिसांवर दबाव. सत्ताधारी पक्षाला वेगळा न्याय आणि जनतेसाठी दुसरा. कशाला हवा शक्ती कायदा.
– मंदिरात कोरोना, शिवजयंतीत कोरोना. पण वरळीत पहाटेपर्यंत कुणाच्या आशीर्वादाने बार चालतात, तेथे कोरोना का येत नाही? इंडिया जस्टीस रिपोर्टमध्ये महाराष्ट्र पोलिस दल २०१९ च्या चौथ्या क्रमांकावरून २०२० मध्ये १३ व्या क्रमांकांवर आले.
– ग्रेटाचे समर्थन. अन लतादिदी आणि सचिन तेंडुलकर यांची चौकशी? २६ जानेवारीची दिल्लीतील हिंसा ही साधी नाही. भारत एकसंध राहील, असे म्हणणे गैर आहे का? देशाबद्दल ट्विट करणाऱ्या या भारतरत्नांचा आम्हाला अभिमान
– शीख फॉर जस्टीस यांनी एक पत्र उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांना पाठविले. स्वतंत्र राष्ट्र करा म्हणून. अशांना थारा द्यायचा नसतो.
– अभिभाषणात संभाजीनगरचा उल्लेख नाही. किमान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तर शब्द पाळा. आमच्यावेळी मुस्लिम आरक्षणाची मागणी करणारे आता गप्प आहेत. ही दुटप्पी भूमिका आहे.
– वैधानिक मंडळ हा विदर्भ, मराठवाड्याचा हक्क आहे. त्यामुळे यावर सरकारने सत्वर कारवाई केली पाहिजे.
मेट्रोचा प्रश्न हा तुमचा किंवा माझा नाही. हा मुंबईकरांचा आहे. मेट्रो यावर्षी मिळाली असती ती आता ४ वर्ष मिळणार नाही. आमच्यावर राग काढा पण मुंबईकरांवर अन्याय करू नका, ही कळकळीची विनंती आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp devendra fadanvis governor bhagat singh koshyari budget session sgy

First published on: 02-03-2021 at 12:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×