राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यपालांच्या भाषणावरील अभिनंदन प्रस्ताव मांडताना फडणवीसांनी राज्य सरकारने राज्यपालांना चौकातलं भाषण दिल्याची टीका केली. याशिवाय त्यांना राज्य सरकारने करोना संकटात घोटाळा केल्याचा गंभीर आरोपही केली. सरकार फक्त फेसबुक लाईव्ह करत असल्याची टीका करताना फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं २१ फेब्रुवारीचं लाईव्ह सर्वोत्कृष्ट होतं असंही म्हटलं.

नेमकं फडणवीस काय म्हणाले –
फडणवीसांनी यावेळी यवतमाळमध्ये लहान मुलांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याच्या आणि भंडारात रुग्णालयात लागलेल्या आगीप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईवरुन प्रश्चचिन्ह उपस्थित करत सरकारमध्ये फक्त फेसबुक लाईव्ह सुरु असल्याची टीका केली.

ठाकरे सरकारने चौकातलं भाषण राज्यपालांकडे पाठवलं – देवेंद्र फडणवीस

“सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न आहे. पण, २१ फेब्रुवारी २०२१ चं फेसबुक लाईव्ह उत्तम होतं. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का विचारलं…मुख्यमंत्री म्हणाले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही. नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण, तुम्हीच सांगितले हे बरे केले,” असा उपहासात्मक टोला फडणवीसांनी लगावला.

राज्यपालांना विमान प्रवास नाकारण्यावरुन टीका
“राज्यपाल तिथे गेले, विमानात इंधन भरलेलं होतं. मग परवानगी नसताना इंधन कसं भरलं? परवानगी नसताना त्यांना बोर्डिंग पास कसा मिळाला? ते आतमध्ये जाऊन विमानात कसे बसले? राज्यपाल आणि आपल्यात मतभेद असतील पण मनाचा इतका कोटेपणा दाखवू नये. राज्यपाल व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नाही तर पद महत्वाचं असतं. आपल्या प्रोटोकॉलमध्ये राज्यपाल पहिल्या क्रमांकावर आहेत. मुख्यमंत्री आणि राज्यपाला यांच्यात कोणाला विमान द्यायचं अशी वेळ आली तर राज्यापलांना द्यायचं असतं,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा, ३०९०० जणांचे प्राण वाचवता आले असते जर…”; फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यपालांना चौकातलं भाषण दिलं –
‘अशाप्रकारे रोज आपण ज्या राज्यपालांना अपमानित करता आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आलाय याचं समाधान वाटतं. ज्यावेळी हे भाषण ऐकलं तेव्हा माझ्या मनात प्रश्न पडला. साहित्यात अनेक प्रकार असतात पण राज्यपालांचं भाषण कोणत्या श्रेणीत मोडतं याचा अभ्यास केला. तेव्हा लक्षात आलं १२ पानांच्या भाषणात कुठेही यशोगाथा दिसत नाही, वेदना आणि व्यथाच दिसतात. आपली बाजू मांडत असताना त्यात काही आकडेवारी मांडली पाहिजे, पण कुठेच दिसत नाही. जसं आपण चौकात भाषण करतो तसंच भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलं,” अशी टीका फडणवीसांनी केली.

लॉकडाउनवरुन टीका
“रुग्णसंख्या जी वाढत आहे की त्यामागे इतर काय आहे असे प्रश्न निर्माण होतात. अमरावतीत जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने चाचणी केंद्रावरुन रिपोर्ट कसा आहे याचा फोन आल्याचं सांगितलं होतं. मग कशाच्या आधारे अमरावतीत लॉकडाउन केला? लॉकडाउन केलं त्या काळात निदान, व्यवस्था नव्हती. पण आज मनात आलं की लॉकडाउन केलं जात आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली.

सरकारकडून भ्रष्टाचार
“कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने ज्याप्रकारे हाताळणी केली असती तर ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी असते, तर ३० हजार ९०० मृत्यू महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं? आम्ही सगळ्यात मोठं रुग्णालय विक्रमी वेळेत बांधल्याचं सांगण्यात आलं…पण यात विक्रमी भ्रष्टाचारदेखील झाला. निविदा न मागवता गाद्या, उशा, सलाइन यांवर ६० लाख रुपये खर्च केले. १२०० रुपयांचं थर्मामीटर ६५०० रुपयांत खरेदी केली. २ लाखांच्या बेडशीटसाठी ८.५ लाख भांड दिलं. पंख्याचं ९० दिवसांचं भाडं ९ हजार दिलं. हजार प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं चार लाख रुपये. लाकडाचे १५० टेबलचं भाडं सहा लाख ७५ हजार रुपये….काय काय घोटाळे सांगायचे. जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळ्याची पुस्तिका तयार केली असून मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे. हा रेकॉर्ड वेळेतील भ्रष्टाचार आहे,” असा आरोप फडणवीसांनी केला. मृतदेहांच्या बॅग, पीपीई किटचाही घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केली. घोटाळा समोर आणला तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी या शब्दाचा अर्थ कळेल अशी टीका त्यांनी केली.

आणखी वाचा- ‘वीज कनेक्शन तोडणी’ला स्थगिती; अजित पवारांची विधानसभेत घोषणा

भाषणातील इतर मुद्दे –
– ९० टक्के लाभार्थी फायदा मिळत असताना DBT बंद केली जात आहे. केवळ मलिदा खाण्यासाठी चांगल्या योजना बंद केल्या जात आहे.
– आदिवासी खावटी योजनेचा सुद्धा गेल्या वर्षभरापासून फायदा दिला जात नाही, काही खास लोकांना फायदा मिळावा यासाठी १ वर्ष हा साधा विलंब समजायचा का. समिती म्हणते थेट रोख रक्कम द्या. मग का देत नाही.
– संत नामदेव महाराज यांचा सरकारला विसर पडला. कोणतेही कार्यक्रम सरकारने घेतले नाही. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावता महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई यांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. सरकारची वारकरी संप्रदायावर नाराजी का? शिवजयंती आणि मंदिर यामुळेच कोरोना वाढतो का?.
– शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरु आहे. अमरावती, अकोला या विभागात ८८ ते १०० टक्के नुकसान बोन्डअळीमुळे झाले आहे. मराठवाड्यात अवकाळीने नुकसान पण मदत मिळत नाही. एकीकडे मदत नाही आणि दुसरीकडे वीज कापली जात आहे.
– विकेल ते पिकेल’ मध्ये झाले काहीच नाही. नियोजन १३४५ मूल्यसाखळीचे, अजून साधा स्टाफ दिला नाही. केवळ २९ ला मंजुरी ५ टक्के सुद्धा अंमलबजावणी नाही.- जलयुक्त शिवारला पर्याय दिला. पण घोषणा केल्यावर ११ महिने मंत्रिमंडळात निर्णय नाही. किमान मुख्यमंत्र्यांचे नाव दिले तर ती तर योजना नीट राबवा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेल्या योजना राबविताना तर नीट भान ठेवा.
– कंत्राट देण्याच्या दबावातून २ कुलगुरू राजीनामे देतात. किती गंभीर आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फोन कोण टॅप करते आहे, हेही सांगा. मंत्री स्वतः ट्विट करतात आणि सकाळी डिलीट करतात.
– पूजा चव्हाण प्रकरणात जितके पुरावे आहेत, तितके पुरावे कोणत्या प्रकरणात नसतील. तक्रार नाही म्हणून केस होत नाही असे कोण सांगते? खटला चालतो तेव्हा तो राज्य विरुद्ध आरोपी असा असतो.
– मेहबूब शेख केवळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून कारवाई नाही. स्वतः डीसीपी बचावासाठी पुढे येतात. इतका पोलिसांवर दबाव. सत्ताधारी पक्षाला वेगळा न्याय आणि जनतेसाठी दुसरा. कशाला हवा शक्ती कायदा.
– मंदिरात कोरोना, शिवजयंतीत कोरोना. पण वरळीत पहाटेपर्यंत कुणाच्या आशीर्वादाने बार चालतात, तेथे कोरोना का येत नाही? इंडिया जस्टीस रिपोर्टमध्ये महाराष्ट्र पोलिस दल २०१९ च्या चौथ्या क्रमांकावरून २०२० मध्ये १३ व्या क्रमांकांवर आले.
– ग्रेटाचे समर्थन. अन लतादिदी आणि सचिन तेंडुलकर यांची चौकशी? २६ जानेवारीची दिल्लीतील हिंसा ही साधी नाही. भारत एकसंध राहील, असे म्हणणे गैर आहे का? देशाबद्दल ट्विट करणाऱ्या या भारतरत्नांचा आम्हाला अभिमान
– शीख फॉर जस्टीस यांनी एक पत्र उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांना पाठविले. स्वतंत्र राष्ट्र करा म्हणून. अशांना थारा द्यायचा नसतो.
– अभिभाषणात संभाजीनगरचा उल्लेख नाही. किमान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तर शब्द पाळा. आमच्यावेळी मुस्लिम आरक्षणाची मागणी करणारे आता गप्प आहेत. ही दुटप्पी भूमिका आहे.
– वैधानिक मंडळ हा विदर्भ, मराठवाड्याचा हक्क आहे. त्यामुळे यावर सरकारने सत्वर कारवाई केली पाहिजे.