वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर टाटा एअरबसचा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून सत्ताराधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या मालिका सुरू आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपा नेते राम कदम यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प नागपुरात आणण्यासाठी तीन आठवड्यांपूर्वीच नितीन गडकरींनी केले होते प्रयत्न

नेमकं काय म्हणाले राम कदम?

“एअरबस आणि वेदान्त-फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या प्रमुख सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, वेदान्त फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा निश्चित करू सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावे लागले? त्यांच्याकडून कोणी आणि किती टक्केवारी, कमिशन मागितले? कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली? बैठकीला कोण-कोण उपस्थित होते? असे प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केले आहेत. जर या नेत्यांची नार्कोटेस्ट केली तर सर्व वसुलीच्या कहाण्या समोर येतील”, असेही ते म्हणाले.

“सत्तेच्या काळात ज्यांनी छोट्या मोठ्या हॉटेलवाल्यापासून कॉन्ट्रॅक्टरपर्यंत आणि बदल्यामध्ये किती कोटी रुपये घायचे, याची यादी बनवली होती. ज्यांनी पोलिसांना सुद्धा सोडलं नाही. ते कोटींचे प्रकल्प काही वसुली न करता सोडतील का?” अशी खोचक टीकाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.

हेही वाचा – गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत – सचिन सावंतांनी लगावला टोला

दरम्यान, याच प्रकरणावरून टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना, ”महाविकास आघाडी सरकारमधील नेते जर प्रामाणिक असतील तर त्यांनी या नोर्कोटेस्टचे स्वागत केले पाहिजे. तळेगावमध्ये आदित्य ठाकरे यांनी सभा घेत वेदान्त-फॉक्सकॉन संदर्भात खोटं बोलत जनतेची दिशाभूल केली. त्याचवेळी आम्ही तिथे सभा घेऊन धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनाही आम्ही कागदपत्रे दाखवण्याची मागणी केली. त्यावेळी कोणताही एमओयू अधिकाऱ्यांनी दाखवला नाही”, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे.