scorecardresearch

चुकीच्या ट्वीटमुळे भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ अडचणीत

मंदिराच्या उभारणीबाबत ट्विटरद्वारे चुकीची माहिती दिल्यामुळे  भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ अडचणीत आल्या आहेत.

चुकीच्या ट्वीटमुळे भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ अडचणीत
भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (संग्रहित छायाचित्र) file photo

रत्नागिरी : येथील प्रसिद्ध पतितपावन मंदिराच्या उभारणीबाबत ट्विटरद्वारे चुकीची माहिती दिल्यामुळे  भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ अडचणीत आल्या आहेत.

गेल्या शतकातील दानशूर समाजसेवक कै. श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सूचनेनुसार ही वास्तू बांधली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत गेल्या २५ नोव्हेंबर रोजी वाघ यांनी  या मंदिराला भेट दिली. त्यानंतर उत्साहाच्या भरात केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधलेल्या पतितपावन मंदिरात जाऊन पूजा केल्याचे नमूद केले. अशा प्रकारे चुकीची माहिती देऊन  भागोजीशेठ कीर यांचे कार्य नष्ट करण्याचा प्रयत्न वाघ यांनी केला आहे. म्हणून त्यांनी माफी मागावी, अन्यथा रत्नागिरीत फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते कुमार शेटय़े यांनी दिला आहे.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत शेटय़े यांच्यासह काँग्रेसचे हारिस शेकासन, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, काँग्रेसच्या रुपाली सावंत इत्यादींनी सांगितले की, वाघ यांनी स्वातंत्र्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न रत्नागिरीत येऊन केला आहे. तशा आशयाचा फलक पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेला असतानासुध्दा हा खरा इतिहास न वाचता त्याची मोडतोड करून खोटा इतिहास पसरवून लोकांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. म्हणून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी या नेत्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 01:45 IST

संबंधित बातम्या