हाथरस प्रकरणावरुन एकीकडे देशभरात संतापाचं वातावरण असताना राजकीय आरोप-प्रत्योरापही सुरु आहेत. महाराष्ट्रातही हाथरस प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं असून रोह्याला चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या मुलीला दरीत फेकून देण्यात आलं तेव्हा ते कुठे होते? अशी विचारणा केली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी ते बोलत होते.

आणखी वाचा- “कायम घरीच बसल्यामुळे ‘त्यांना’ बाहेर काय घडतंय याचा अंदाज येत नसावा”

हाथरस घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारण केलं जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला असून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्हीदेखील केली असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “उत्तर प्रदेशातील घटना दुर्दैवी असून चंद्रकांत पाटील यांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार असलं तरी आमची भूमिका स्पष्ट असून कोणीही घटनेची पाठराखण केलेली नाही आणि करणार नाही”. परिस्थिती हाताळण्यात योगी सरकार अपयशी ठरलेलं नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “हाथरस घटनेची चौकशी मुंबई पोलिसांनी करावी,” शिवसेना आमदाराची गृहमंत्र्यांना विनंती

प्रवीण दरेकर यांनी यावेळी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “रोह्याला चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पुण्यात एका तरुणीला डोंगरात नेऊन दगडाने ठेचून मारण्यात आले, त्यावेळी राज्य सरकार झोपले होते का?,” अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली. “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. त्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, संजय राऊतकोणीच बोलायला तयार नाहीत,” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.