सांगली : सांगली जिल्हा बँकेमध्ये अनामत खाती जमा असलेल्या दुष्काळ निधीवर डल्ला मारणार्‍या तीन कर्मचार्‍यांना  निलंबित करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चौकशीनंतर या कर्मचार्‍यांवर फौजदारी कारवाईही करण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

हेही वाचा >>> महायुतीत वादाची ठिणगी? श्रीरंग बारणेंच्या आरोपानंतर उमेश पाटील म्हणाले, “थोडंफार उन्नीस बीस…”

दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या तसेच पिक विम्याच्या मदतीचा निधी वेळोवेळी जिल्हा बँकेमार्फत देण्यात येतो. हा निधी संबंधित लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जातो. मात्र ज्यांची बँक खाती बंद आहेत, अथवा अन्य बँकेत खाती आहेत  अशा कारणांनी लाभार्थी शेतकर्‍यांचा कोट्यावधींचा मदत निधी बँकेत अनामत खाती ठेवण्यात येतो.

हेही वाचा >>> “त्यांनी शिंदेंना सलाम ठोकणं मला पटलं नाही”, पत्नीच्या वक्तव्यावर गजानन कीर्तिकर म्हणाले, “माझ्यावर…”

जिल्हा बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड व निमणी शाखेत अपहार झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी योगेश वजरीनकर, एम.वाय. हिले आणि प्रमोद कुंभार या तिघावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वजनीरकर यांने मदत निधीतील ५९ लाख रूपये परस्पर वळते  करून हडप केले आहेत, तर निमणी  शाखेतील कुंभार यांने २२ लाख रूपये परस्पर हडप केले आहेत. हिले हे मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी आहेत. या पुढे पाच वर्षाहून अधिक काळ एकाच शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची तात्काळ तर तीन वर्षे पुर्ण केलेल्या अधिकार्‍यांच्या जुलैमध्ये बदल्या करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा बँकेच्या सर्वच शाखांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासाठी ४८ कर्मचार्‍यांची पथके नियुक्त करण्यात आली असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.