सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे एक भयंकर घटना घडली आहे. सावंतवाडी येथील एका महिलेनं सुपारी समजून अडकित्याने चक्क गावठी बॉम्ब फोडला आहे. गावठी बॉम्ब अडकित्याने फोडल्यामुळे संबंधित महिलेची भंयकर अवस्था झाली आहे. या घटनेच ६० वर्षीय महिलेचं एक बोट पूर्णपणे तुटले असून हाताला देखील मोठी दुखापत झाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.

लक्ष्मी सखाराम देवळी असे संबंधित जखमी महिलेचे नाव आहे. जखमी लक्ष्मी देवळी या सांवतवाडीच्या ओटवणे या गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी लक्ष्मी देवळी यांनी सुपारी समजून गावठी बॉम्ब अडकित्त्याने फोडला. गावठी बॉम्ब अडकित्याने दाबताच त्याचा मोठा स्फोट घडला. यामध्ये देवळी याच्या एका हाताचं बोट तुटलं आहे. तसेच हाताला देखील गंभीर दुखापत झाली आहे. स्फोटाचा आवाज एवढा भयानक होता, की शेजारील व्यक्तीही त्या आवाजाने घाबरल्या.

या घटनेनंतर, शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत लक्ष्मी देवाळी यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून याबाबत चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.