बसमध्ये होणारी महिलांची छेडछाड रोखण्याच्या हेतूने राज्य परिवहन महामंडळाने असा प्रकार झाल्यास बस थेट पोलीस ठाण्यात नेण्याचा निर्णय घेतल्यानंतर या प्रकाराची त्वरीत अंमलबजावणी होऊ लागल्याचे दिसत आहे. महिला बस वाहकाचा विनयभंग केल्याप्रकरणी नांदगाव-मनमाड ही बस थेट मनमाड पोलीस ठाण्यात नेण्यात येऊन संशयितास अटक करण्यात आली. गुरूवारी या संशयितास न्यायालयात उपस्थित केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
बुधवारी नांदगावहून कोंढारमार्ग मनमाड ही बस निघाली असता महिला वाहकाने १९ वर्षांच्या संदीप प्रदीप मिसर या विद्यार्थ्यांकडे तिकीट मागितले. विद्यार्थ्यांने पास दाखविल्यावर वाहकाने ओळखपत्र मागितले. ओळखपत्र नसल्याचे मिसरने सांगितल्यावर वाहकाने त्यास तिकीट काढण्यास बजावले. त्याचा राग येऊन मिसरने वाहकाचे दोन्ही हात धरून शिवीगाळ केली. त्यामुळे ही बस थेट मनमाड पोलीस ठाण्यात नेण्यात आली. वाहकाने यासंदर्भात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मिसर यास ताब्यात घेतले. गुरूवारी त्यास न्यायालयात उपस्थित करण्यात आले.