धाराशिव : उद्धव ठाकरे गटाचे खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील आण्णाभाऊ साठे चौकातून मोठे शक्तिप्रदर्शन करीत राजेनिंबाळकर यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपली उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल केल्यानंतर पालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोर जनसभेचे आयोजन करण्यात आले होते.

महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. राजेनिंबाळकर यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केल्यानंतर बुधवारी दुपारी धारासूर मर्दिनी, हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे. यांच्या दर्ग्याचे दर्शन घेवून शहरातील साठे चौकातून रॅलीस शुभारंभ झाला. प्रमुख मार्गावरून रॅली काढून ही रॅली नेहरू चौक, माऊली चौक, काळा मारूती चौक, पोस्ट ऑफीसमार्गे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी दाखल झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या जोरदार घोषणा देत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली. त्यानंतर उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आणखी वाचा-माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांची उमेदवारी दाखल

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोर जनसभेचे आयेाजन करण्यात आले होते. या जनसभेला माजी मंत्री आमदार अमित देशमुख, माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे, माजी मंत्री आमदार सचिन अहिर, आमदार रोहित पवार, जिल्हा संपर्कप्रमुख शंकर बोरकर, डॉ. प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या जनसभेत ओम राजेनिंबाळकर यांच्या विजयासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी जाहीर संकल्प करावा आणि सर्वाधिक मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन सर्वच प्रमुख नेत्यांनी केले. दरम्यान शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांना उष्माघातामुळे अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मंगळवारी तीन उमेदवारी अर्ज दाखल

मंगळवारी तीन व्यक्तींनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मनोहर आनंद पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आजवर ४९ व्यक्तींनी ११८ अर्जाची खरेदी केली.