लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. अशातच वेगवेगळ्या पक्षांमधील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यापासून दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर कोटी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवारदेखील भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते, मात्र नंतर त्यांनी वेगळा विचार केला’, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. अजित पवार गटातील नेत्यांनी पटेलांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे, तर शरद पवार गटातील नेत्यांनी हा दावा चुकीचा असल्याचं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार गटातील नेते आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील पटेलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, मी त्याबद्दल काही ऐकलं नाही. परंतु, शरद पवारांनी आधीसुद्धा भाजपाप्रणित एनडीएत जाण्याचा प्रयत्न केलेला. २०१४ च्या निवडणुकीतही पवारांनी तसा प्रयत्न केलेला. तुम्हा सर्वांना आठवत असेल, २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपात बिनसलं होतं, भाजपाचे बहुमतापेक्षा थोडे कमी आमदार होते, तेव्हा आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेसने) भाजपाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. तेव्हापासूनच हे सगळं चाललेलं.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, “मी आता या निवडणुकीत त्या दाव्यावर काही बोलणार नाही. मी याआधीदेखील या विषयावर बोललो आहे. परंतु, ते सत्य आहे”

हे ही वाचा >> “राज ठाकरेंनी जनतेला आधीच इशारा दिलेला…”, जयंत पाटलांचं वक्तव्य; म्हणाले, “मनसे अध्यक्ष आता…”

पाठोपाठ यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील भाष्य केलं आहे. पाटील म्हणाले, शरद पवार असं कधी म्हटले नाहीत. हेच लोक (प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार गटातील त्यांचे सहकारी) सतत जाऊन शरद पवारांकडे आग्रह करत असतील, त्यावर शरद पवार किती वेळा आणि काय-काय बोलणार? शरद पवारांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. परंतु, त्यांनी नेहमीच मनाविरोधातल्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. उलट शरद पवार यांना पक्षसंघटना एकत्रित ठेवायची होती, मजबूत ठेवायची होती, त्यामुळे असं कोणीही काहीही बोलत असतील तर शरद पवारांनी या लोकांची समजूत काढली असेल.