scorecardresearch

Video: “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी…”, ‘त्या’ टीकेनंतर शिंदे गटातील खासदारांचं जाहीर आव्हान!

“इथले गद्दार खासदार आणि आमदारांमध्ये जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल, तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की आम्ही…!”

Video: “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी…”, ‘त्या’ टीकेनंतर शिंदे गटातील खासदारांचं जाहीर आव्हान!
उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यामध्ये शेतकरी मेळाव्यासमोर आक्रमक भाषण करत शिंदे गटावर हल्लाबोल केला. या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटाला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंच्या आक्रमक भाषणानंतर त्यावर शिंदे गटाकडून टीकाही करण्यात आली. “शेतकरी मेळावा म्हणताना एकही नेता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलला नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या या सभेची खिल्लीही उडवण्यात आली. या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील शिंदे गटाच्या ज्या खासदारांना उद्धव ठाकरेंनी भाषणात बोलताना आव्हान दिलं होतं, त्यांनीच आता उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांवर परखड शब्दांमध्ये टीका केली होती. “इथले गद्दार खासदार आणि आमदारांमध्ये जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल, तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की आम्ही भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार नाही. यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, त्यांचा चेहरा पाहिजे, शिवसेनेचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद मोदींचा पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते.

“…तर आयुष्यभर उद्धव ठाकरेंचे पाय चेपू, त्यांनी फक्त…”, आमदार संजय गायकवाड यांचं जाहीर आव्हान!

“…तर आयुष्यभर आम्ही त्यांचे पाय चेपू”

यावेळी उद्धव ठाकरेंनी खोके सरकार म्हणून केलेल्या टीकेला शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. “खोके आणि बोके.. खोक्यांशिवाय गेल्या तीन-चार महिन्यांत त्यांना दुसरा कुठला विषय मांडता आला का? उद्धव ठाकरेंनी सीआयडी वगैरे जेवढ्या यंत्रणा असतील, त्या लावून या खोक्यांचा एक तरी पुरावा आणून दाखवावा. जर त्यांनी असं केलं, तर आयुष्यभर आम्ही त्यांचे पाय चेपत बसू. त्यांनी फक्त एकदा हे सिद्ध करून दाखवावं”, असं आव्हान संजय गायकवाड यांनी दिलं होतं.

“भाजपाच्या तिकिटावर लढण्याचा प्रश्न येतोच कुठे?”

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला एकीकडे संजय गायकवाडांनी प्रत्युत्तर दिलं असताना दुसरीकडे बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.”माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इथून माझ्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवावी. मी शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार. भाजपाच्या तिकिटावर लढण्याचा विषय येतो कुठे? आम्ही शिवसेना पक्षातच आहोत. शिवसेनेचेच आहोत. बाळासाहेबांच्याच विचारांनी आम्ही चाललो आहोत”, असं प्रताप जाधव म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 13:18 IST

संबंधित बातम्या