शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकात रोखठोक या सदरात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले होते. “नितीन गडकरी यांच्या प्रचारात फडणवीस नाईलाजाने उतरले, एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटले, तसेच अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी शिंदे यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले”, असे अनेक आरोप आणि दावे संजय राऊत यांनी आपल्या सदरात केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावतीने त्यांच्या विधी सल्लागारांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजवाली आहे. तसेच तीन दिवसांच्या आत माध्यमांसमोर बिनशर्त माफी मागावी, असे या नोटीशीद्वारे सांगण्यात आले आहे. अन्यथा संजय राऊत आणि दैनिकाला फौजदारी आणि दिवाणी स्वरुपाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“…म्हणून देवेंद्र फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले”, गडकरींचा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा; मोदी-शाहांना केलं लक्ष्य!

नोटिशीत काय म्हटले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंधे आणि महायुतीमधील पक्षांविरोधात सातत्याने बदनामीकारक मजूकर प्रसिद्ध केल्याचा उल्लेख नोटिशीत करण्यात आला आहे. तसेच २६ मे रोजीच्या सदरात एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटल्याचा बिनबुडाचा आणि धांदात खोटा आरोप केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांचे उमेदवार निवडून येऊ नयेत, यासाठीही खटाटोप केल्याचा आरोप सदरात होता. हा आरोपही बदनामीकारक आणि दिशाभूल करणारा असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत एकही पैसा वितरित केलेला नाही. जर पैसे वाटल्याचा आरोप करायचा असेल तर त्यासंबंधीचे पुरावे सादर करा, असेही यात म्हटले आहे. फक्त मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशाप्रकारचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप या नोटिशीतून करण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी काय आरोप केले होते?

संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. “दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५-३० कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले”, असा गंभीर दावा संजय राऊतांनी केला होता.

“फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले”

याशिवाय देवेंद्र फडणवीसांवरही संजय राऊतांनी आरोप केला. “४ जूननंतर भाजपात मोदी-शाहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात”, असे संजय राऊतांनी या लेखात म्हटले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde send legal notice to sanjay raut on saamana article kvg
Show comments