तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी एकच वेळेला पोहचू शकतो तर ते का वापरु नये?, असा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांना विचारला आहे. मुख्यमंत्री करोनाच्या कालावधीमध्ये मंत्रालयामध्ये जाताना दिसत नसल्याची टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी विशेष मुलाखतीमधून उत्तर दिलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेलेल्या विशेष मुलाखतीमध्ये उद्धव यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने मी संपूर्ण महाराष्ट्रावर लक्ष ठेऊन असल्याचं सांगितलं.

करोनाच्या पार्श्वभूमीवर काही आठवड्यांपूर्वी पार पडलेली सर्व पक्षीय बैठक असो किंवा इतर आढावा बैठकी असो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत अशी टीका करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मिडियावर विरोधकांनी मागील काही कालावधीमध्ये व्हायरल केल्याचे पहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना, “करोना कालावधीमध्ये तुम्ही मंत्रालयामध्ये कमीत कमी वेळा गेलात, असा आपल्यावर सतत आरोप होतो याबद्दल काय सांगाल?,” असा प्रश्न विचारला.

नक्की वाचा >> “त्यांनी त्यांचा महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिला असल्याने ते…”; उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका

“तंत्रज्ञानाचा योग्य वापर करु शकत नसाल तर…”

राऊत यांच्या याच प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी तंत्रज्ञानाच्या मदतीने अगदी योग्य पद्धतीने काम सुरु असल्याचे सांगितले. “मंत्रालय आता बंद आहे. आज तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे. तुम्ही त्याचा योग्य वापर करु शकत नसाल तर तुमच्यासारखे दुर्भाग्य असणारे तुम्हीच आहात. आता मुलाखत झाल्यानंतर घरी जाऊन मी महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. हे रोजचं चाललं आहे. विदर्भातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक मी काल व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन घेतली. परवा (महाविकास आघाडीतील) तिन्ही पक्षांच्या आमदारांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. म्हणजे एका वेळेस घरात बसून मी सगळीकडे जाऊ शकतो. मी पूर्ण राज्य कव्हर करतोय आणि निर्णय घेतोय,” असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीवर आपलं पूर्णपणे लक्ष असल्याचे सांगितलं.

“…तर मग शोध लावता कशाला?”

याच प्रश्नासंदर्भात पुढे बोलताना त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्त परिणामकारकपणे काम होत असल्याचे म्हटले आहे. “आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. फिरणं आवश्यक आहे हे मी मान्य करतो, त्याला मी नाही म्हणत नाही. मात्र जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी जाता. पण ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सर्व ठिकाणी जाता. प्रवासाचा वेळ वाचतो,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर ते वापरायला हवे असं मत व्यक्त करताना त्यांनी, “उद्या मी म्हणेन की तुम्ही विमानाने का जाता बैलगाडीतून जा. तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करायचाच नाहीय तर मग शोध लावता कशाला?,” असा खोचक सवाल टीकाकारांना केला.

नक्की वाचा >> ‘राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा पुन्हा लॉकडाउन का करावं लागत आहे?’; मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

जनतेशी होणारा संवाद कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्री म्हणतात…

उद्धव य़ांच्या या उत्तरावर संजय राऊत यांनी, “या तंत्रज्ञानामधून तुम्ही अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकता मात्र जनतेशी संवाद कमी होतोय असं नाही वाटतं का?” असा प्रश्न विचारला. “सध्या आपली परिस्थिती लॉकडाउनची आहे. सभा, समारंभांना बंदी आहे. जनतेला त्यासाठी बोलवणं म्हणजे आपला नियम आपणच मोडण्यासारखं आहे. म्हणजे मी मुख्यमंत्री आहे तर माझ्या आजूबाजूला कोणी येणार नाही. पण माझ्यासमोर माझी जनता बसेल त्यांचं काय? ते असे दाटीवाटीने बसले मी संवाद साधला. मात्र त्यामुळे ते आजारी पडले तर त्या संवादाचा उपयोग काय होणार? नियमांचं पालन मी नाही केलं तर जनता का करेल?,” असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तसेच हे असं वागणं म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ असं होईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. या उत्तरामधून मुख्यमंत्र्यांना नियमांमुळे आपण मंत्रालयात कमी जातो तसेच जनतेलाही भेटणं टाळतो असचं सूचित केलं आहे.