ऑनलाइन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचा स्तुत्य पुढाकार

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि तत्सम सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी तलासरीतील शिक्षकांनी ‘शिक्षण विद्यीर्थ्यांच्या दारी’ हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत शालेय शिक्षणाचे धडे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरीच घेता येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची योग्य सोय होणार असून त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.

करोनाकाळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक धडे देण्याचे शासनाने म्हटले होते. मात्र पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांतील तालुक्यांमध्ये ऑनलाइन शिक्षण घेण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध नव्हती. परिणामी हे विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित होते. यामुळे त्यांच्या पालकांना धास्ती लागली होती. तलासरी तालुक्यातील शाळांचा निकाल चांगला असला तरी अशा विविध कारणांमुळे तो निकाल घसरण्याची शक्यता लक्षात घेत शिक्षकांनी एकत्रित येत या परिस्थितीवर मात करण्याचे ठरविले. त्यासाठी तलासरी तालुक्यातील १५४ जिल्हा परिषद शाळांमधील २०० हून अधिक शिक्षकांनी एकत्र येत ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे ठरविले. यासाठी शालेय पाठय़क्रमावर आधारित असलेला ‘शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी’ हा स्तुत्य उपक्रम शिक्षकांनी १ जुलैपासून हाती घेतला आहे.

उपक्रम काय?

ऑनलाइन  शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शिक्षकांनी विविध अभ्यासगट तयार करून त्या गटाच्या माध्यमातून शाळा क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिक्षण देण्याचे प्रस्तावित केले. त्यानुसार शिक्षकांच्या या अभ्यासगटाने विद्यार्थ्यांना सहज व सोपे शालेय शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी शालेय पाठय़क्रमावर आधारित स्वाध्याय पुस्तिका तयार केली. या स्वाध्याय पुस्तिकेमध्ये धडय़ावर आधारित प्रश्नावली तयार करण्यात आली. ही स्वाध्याय पुस्तिकाच्या माध्यमातून शिक्षकांनी दुर्गम भागातील विद्यर्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षण दिले. यासाठी एका शिक्षकामार्फत दिवसभरात ७ ते ८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले जात आहेत. एका विद्यार्थ्यांला किमान अर्धा तास हे धडे शिक्षकांमार्फत दुर्गम भागात घरोघरी जाऊन दिले जात आहे.

दुर्गम भागात सुविधा नसलेले विद्यार्थी प्रवाहाबाहेर जाऊ  नये यासाठी हा विशेष प्रयत्न शिक्षकांच्या माध्यमातून सुरू आहे. अशा विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवण्याचा आनंद वेगळाच आहे. विद्यार्थीही त्याला प्रतिसाद देत आहेत.

– ज्ञानेश्वर पाटील, प्रकल्प केंद्रप्रमुख, तलासरी