|| तुकाराम झाडे

राजीव सातव यांच्या राजकारणावर हिंगोलीत चर्चा :–  माजी खासदार राजीव सातव यांची दिल्लीतील प्रतिमा वजनदार नेते अशी आहे. पण स्व-मतदारसंघात मात्र ते तसे ‘अशक्त’ ठरतात. हिंगोली जिल्ह्य़ात काँग्रेसचे आता काहीएक अस्तित्व राजकीय पटलावर दिसून येत नाही. हिंगोली एका अर्थाने काँग्रेसमुक्त आहे. त्यांचा जिल्हा राजकीय अर्थाने कुपोषित असताना दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आव्हान त्यांना कसे पेलवेल, असा प्रश्न विचारला जात आहे. नुकतीच राजीव सातव यांच्यावर उमेदवारी अर्ज छाननी समितीच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

‘राहुल ब्रिगेड’ मधील महत्त्वाचा नेता अशी सातव यांची ओळख आहे. म्हणूनच त्यांच्यावर गुजरातचे प्रभारीपद देण्यात आले होते. दिल्लीतील नेत्यांकडून मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर ती पार पाडण्यासाठी कष्ट करणाऱ्या राजीव सातव यांना हिंगोली जिल्ह्य़ातील राजकारणाला मात्र आकार देता आला नाही.

राजीव सातव यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात पंचायत समितीपासून केली. नंतर जिल्हा परिषद, कळमनुरी विधानसभा ते िहगोली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. अत्यंत कमी वयात त्यांना ही सर्व पदे मिळाली. २०१४ च्या लोकसभा  निवडणुकीत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावाची चर्चा होती, तेव्हा राज्यातून निवडून आलेल्या दोन खासदारांपकी ते एक होते. गुजरातचे प्रभारी पद मिळाल्यानंतर सातव यांनी निवडणूक मदान सोडले.

ऐनवेळी लोकसभेसाठी उमेदवार नसल्याने इतर पक्षाकडून उमेदवार आयात करण्याची वेळ काँग्रेसवर आली. माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या रुपाने मिळालेले उमेदवाराचा लोकसभेत पराभव झाला.  विशेष म्हणजे कळमनुरी पंचायत समितीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत असताना ठरल्याप्रमाणे उपसभापतीने राजीनामा दिल्यानंतर झालेल्या उपसभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा उपसभापती निवडून आला होता. यावरून काँग्रेस अंतर्गत गटबाजीच्या खेळाचे दर्शन सर्वाना घडले, कळमनुरी नगरपालिकेवर नेहमीच काँग्रेसचा झेंडा फडकला. मात्र, राजीव सातव यांच्याकडे जिल्ह्यचे नेतृत्व असताना काँग्रेसच्या हातून कळमनुरी नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. त्यामुळे दिल्लीत वजनदार आणि गल्लीत पोकळी असे त्यांच्या राजकारणाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.