अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी जागा कुठल्या हव्यात हेदेखील सांगितलं. आज त्यांनी राजीनामा दिला असेल आणि जर ते भाजपात गेले तर याचा अर्थ त्यांचा आदर्श घोटाळा भाजपाला पवित्र करुन घ्यायचा आहे अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसंच काँग्रेस पक्षाबाबत त्यांनी केलेलं विधानही चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलंय संजय राऊत?

“अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य हे काँग्रेस पक्षात गेलं आहे. आज अशोक चव्हाण जे काही आहेत ते काँग्रेसमुळेच आहेत. भाजपाने त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी जंग जंग पछाडलं होतं. आदर्श घोटाळा भाजपाला जर पवित्र करुन घ्यायचा असेल तर आम्ही पाहू. कालपर्यंत ते आमच्यातच होते. महाविकास आघाडीच्या बैठकीला आले होते. अजूनही ते आमच्यात आहेत अशी मी आशा बाळगतो. कुणाला जर वाकडी पावलं टाकायची असतील तर कोण अडवणार?

काँग्रेस ही अजरामर म्हातारी

काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जर शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र देत असतील तर हे मुलाने आईला नाकारण्यासारखं आहे.” काँग्रेस फोडला जाईल का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, काँग्रेस ही अजरामर म्हातारी आहे ती मरणार नाही कधीच.”

हे पण वाचा- काँग्रेसची अवस्था शरपंजरी झालेल्या भीष्माचार्यांसारखी का झाली?

अशोक चव्हाणांचा राजीनामा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांनंतर अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. तसेच काही वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की, अशोक चव्हाण हे १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील. तसेच भाजपा अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं असताना चव्हाण यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येत या सर्व अफवांचं खंडण केलं, तसेच पक्ष सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिलं.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

अशोक चव्हाण म्हणाले, “प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं काही नाही. तसेच प्रत्येक कारण सर्वांना सांगितलंच पाहिजे असंही काही नाही. सगळ्याच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत. मी कधीही माझ्या पक्षांतर्गत बाबी लोकांसमोर, माध्यमांसमोर मांडल्या नाहीत. तसेच पक्षात काही उणीदुणी असतील तर मी ती कधीही चव्हाट्यावर मांडली नाहीत.” पक्ष सोडण्याच्या निर्णयाबाबत अशोक चव्हाण म्हणाले, मी सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये आहे. आता मला वाटतं की मी अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे. काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress is like an old woman who will never die said sanjay raut scj