सोलापूर : येत्या ३१ ऑगस्ट रोजी सोलापुरात राज्यस्तरीय ओबीसी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे येणार असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याची आखणी करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या बोलावलेल्या बैठकीत शहराध्यक्ष व सरचिटणीस यांच्यात शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला.

सिध्देश्वार पेठेतील काँग्रेस भवनात पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या दौऱ्याची आखणी करण्यासाठी पक्षाची बैठक बोलावली होती. परंतु या वेळी सरचिटणीस केशव इंगळे यांनी शहराध्यक्ष वाले यांना काही अडचणीचे प्रश्न विचारले. त्यावरून दोघांत वाद झाला. वाले हे जबाबदारीने पक्षाचे काम प्रामाणिकपणे व निष्ठेने करीत नाहीत. महापालिका निवडणूक तोंडावर आली तरीही पक्षाच्या हालचाली दिसत नाहीत.

त्यामुळे अगोदरच कमकुवत असलेला पक्ष आणखी कमकुवत होईल आणि महापालिकेत पक्षाच्या नगरसेवकांची संख्या चौदावरून घसरून चारपर्यंत खाली येईल, अशा शब्दांत वाले यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यामुळे वाले हे संतापले. वाद एवढ्या विकोपाला गेला की, एकमेकांच्या अंगावर जाण्याचाही प्रकार घडला. इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवावा लागला. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची माहिती शहराध्यक्ष वाले यांनी प्रदेश पक्षश्रेष्ठींना कळविली असून शहराध्यक्षपद सोडण्याचीही तयारी दर्शविली आहे.