काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झालं. पहाटे खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधी घराण्याचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पाटील ओळखले जात होते. रविवारी राहत्या घरातल्या बाथरुममध्ये ते पाय घसरुन पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.विजय वडेट्टीवार यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसंच त्यांना आदरांजलीही वाहिली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली खंत

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आधारवड, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार पी एन पाटील यांच्या निधनाने वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे. पी एन पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला बळ मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना.

रविवारी नेमकं काय घडलं?

पी. एन. पाटील रविवारी सकाळी साडे आठ सुमारास घरी चक्कर येऊन बाथरुममध्ये पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आलं. ज्यामुळे पाटील यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचं लक्षात आले. त्यांना तातडीने आधार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यांच्या मेंदूची सूज कायम होती. त्यामुळे तुलनेत प्रकृती स्थिर असली तरी गंभीर होती. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना सुरु होती. गोकुळ दूध संघाकडूनही त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली होती. मुंबईचे प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. सुहास बराले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पी. एन. पाटील यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर मतदारसंघासह जिल्ह्यात झंझावाती प्रचार केला होता. कोल्हापूर लोकसभेला सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले होते. करवीर विधानसभा मतदारसंघातून पी. एन. पाटील आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीसाठी पी. एन. पाटील यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, वय आणि प्रकृती लक्षात घेत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.