माझ्याकडे अनेक गुपिते दडली आहेत. ती उघड केली तर संपूर्ण देश हादरेल, असे घणाघाती विधान करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आव्हान दिले असून, खडसे यांनी आपल्या पोटात काहीही दडवून न ठेवता सर्व माहिती उघड करावीच, असे विरोधकांनी म्हटले आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी खडसेंना गुपिते लवकरात लवकर उघड करण्याचे आव्हान दिले आहे. खडसे स्पष्टवक्ते आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडील सर्व माहिती उघड करून टाकावी, असे आव्हान भास्कर जाधव यांनी दिले.
मंत्रिपदाची मी पर्वा करत नाही, पण माझी बदनामी हे ठरवून केलेले कृत्य आहे. विरोधी पक्षांनी आरोप केले नाहीत, तर अंजली दमानिया, प्रीती मेनन यांना पुढे केले गेले. या सर्व घडामोडींमागे कोण आहे हे माहीत असले तरी मी आत्ता बोलणार नाही. अनेक गुपिते त्यामागे दडली आहेत. आपण तेव्हा गुपिते उघड केली असती तर संपूर्ण देश हादरला असता, असे घणाघाती विधान एकनाथ खडसे यांनी बुधवारी नाशिक येथे कार्यकर्ता मेळाव्यात केले होते.
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिनाभरात आपले कोण आणि परके कोण हे कळले आहे. हा नाथा संपणारा नसून संपविणारा आहे. त्यामुळे पक्षात राहून जे आरडाओरड करीत आहेत, त्यांचा आधी समाचार घेतला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना ‘मार्गदर्शन’ करताना स्वकीयांविरोधात प्रथमच तोफ डागली. संतप्त कार्यकर्त्यांनी अन्य नेत्यांना बोलूच दिले नाही. त्यामुळे त्यांची भाषणे त्रोटकच झाली. खडसे म्हणाले की, आपला कोण, परका कोण हे आता ओळखले पाहिजे. पक्षात राहून जो पक्ष नेतृत्वाशी गद्दारी करत असेल त्याला संपविले पाहिजे, असे खडसे यांनी म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.