काँग्रेसची बंडखोरीने राष्ट्रवादीची अडचणीत वाढल्या

हर्षद कशाळकर,अलिबाग-

काँग्रेस आणि शिवसेनेचा पांरपारीक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणारया श्रीवर्धन मतदारसंघातून सलग दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आले आहेत. मात्र मतदारसंघात काँग्रेसच्या पदाधिकारयांनी केलेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेनीही तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने मतदारसंघात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

श्रीवर्धन, म्हसळा, तळा हे तीन पुर्ण तालुके तर माणगाव आणि रोहा तालुक्यातील काही भाग मिळून श्रीवर्धन मतदारसंघ तयार झाला आहे. मतदारसंघात १० जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. यातील सात जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या तर तीन शिवसेनेच्या ताब्यात आहेत. श्रीवर्धन, रोहा नगर पालिका आणि माणगाव, म्हसळा  नगरपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तर तळा नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मतदारसंघात २ लाख ५७ हजार ३३१ मतदार आहेत, यात १ लाख २५ हजार ९६५ पुरुष आणि १ लाख ३१ हजार २९८ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघासाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी विनोद घोसाळकर यांच्यात प्रमुख लढत अपेक्षीत आहे. काँग्रेसचे जिल्हा उमाध्यक्ष ज्ञानदेव पवार, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष दानिश लांबे, तर म्हसळा तालुका काँग्रेस कमिटीचे मुहीज शेख यांनी बंडखोरी करत निवडणूकीत उडी घेतली आहे. त्यामुळे आघाडीच्या मतांचे विभाजन अटळ आहे.

लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना याच मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. शिवसेनेच्या अनंत गीते यांच्यावर श्रीवर्धन मधून घेतलेली ३७ हजार मतांची आघाडी त्यांच्या विजयात निर्णायक ठरली होती. मात्र लोकसभा निवडणूकीनंतर पक्षांला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. श्रीवर्धनचे आमदार अवधुत तटकरे यांनी शिवेसेनेत प्रवेश केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्षपदाची धुरा संभाळणारे प्रमोद घोसाळकर हे देखिल शिवसेनेत दाखल झाले आहेत. अशातच काँग्रेसच्या तीन बंडखोरांनी निवडणूकीत उडी घेतल्याने राष्ट्रवादींच्या अडचणीत वाढल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराबरोबरच काँग्रेसच्या बंडखोरांना थोपविण्याचे दुहेरी आव्हान राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या समोर असणार आहे.

काँग्रेसच्या बँरीस्टर ए. आर. अंतुले यांचा पारंपारीक मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ ओळखला जायचा. नंतर मात्र शिवसेनेनी मतदार संघावर आपली पकड मिळवली. सेनेचे चार उमेदवार विधानसभेवर निवडून गेले. मात्र गेल्या दशकात काँग्रेस आणि शिवसेनेच्या पांरपारीक मतदारसंघात शिरकाव केला आणि सलग दोनवेळा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. आज राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ म्हणून ओळखला जात आहे. मात्र निवडणूकीच्या पाश्र्वभुमीवर मतदारसंघात बदललेल्या राजकीय समिकरणांचा राष्ट्रवादी काँग्रेस कसा सामना करणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मतदारसंघातील प्रश्न  काय आहेत?

आंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, चांगल्या आरोग्य सुविधांचा आभाव, बेरोजगारी, आर्थिक मंदीच्या छायेत रुतलेला दिघी प्रकल्प, पर्यटनाच्या पायाभुत सुविधांचा आभाव, दिल्ली मुंबई कॉरीडोर प्रकल्पाला स्थानिकाडून होणारा विरोध, चांगल्या शैक्षणिक सुविधांचा कमतरता, ग्रामिण भागातील पाणी प्रश्न, बाणकोट खाडीवरील रखडलेला पुल, शेती आणि बागायतदारांचे प्रश्न, कामानिमित्याने तरुणांचे परदेशात होणारे स्थलांतरण, हरीहरेश्वर, दिवेआगर या पर्यटनस्थळांचा रखडलेला विकास, वीज समस्या या सारख्या समस्या मतदारसंघाला भेडसावत आहेत.

काँग्रेसचे बंडखोर ही शिवसेनेची ‘बी टिम’ : खासदार सुनील तटकरे

अलिबाग : श्रीवर्धन मधील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शिवसेनची बी टिम असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत रोहा येथील एका हॉटेल मध्ये बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हसळा येथील पाबरे येथे जाहिर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना नेते अनंत गीते यांच्यावरही निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. काही लोकांना व्यक्ती व्देशाने पछाडले आहे. त्यांनी मतदारसंघात बंडखोरी केली आहे. हे तिघही शिवसेना पुरस्कृत आहेत. रोहा येथील एका हॉटेल मध्ये शिवसेनेचे नेते आणि या तिघांची बैठक झाली आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करायचे आणि धार्मिक विद्वेश पसरवायचा हा या मागचा मुळ उद्देश आहे असा दावा त्यांनी यावेळी केला.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि उमेदवार विनोद घोसाळकर यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणूकीतील पराभवामुळे अनंत गीते व्यथित झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या कुटूंबियांवर आरोप करत सुटले आहेत. मतदारसंघात निष्Rीय राहल्यानेच रायगडकरांनी त्यांचा पराभव केला. मुंबईतून आयात करून शिवसेनेनी विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना पुन्हा मुंबईत पाठवा. विनोद घोसळकर यांची डॉक्टरेट पदवी बोगस असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.    यावेळी  राष्ट्रवादीचे नेते भास्कर विचारे, म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर, अल्पसंख्यांक सेलेचे उपाध्यक्ष अली कौचाली, फैसल शेख आदी उपस्थित होते.