माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते भाजपाकडून राज्यसभेवर खासदारही झाले. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचे पाहायला मिळाले. अशोक चव्हाण यांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हल्लाबोल करत काँग्रेसच्या राज्याच्या नेतृत्वार अनेकदा टीका केली. यानंतर आता पुन्हा एकदा नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यात जुंपली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका सभेत बोलताना अशोक चव्हाण यांचे नाव न घेता ‘नाचता येईना अंगण वाकडं’ असा टोला लगावला . त्यानंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत ‘नाना पटोलेंनी भरपूर नाच केला आहे’, असा पलटवार केला.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

नाना पटोले काय म्हणाले?

“लोकसभेमध्ये जेव्हा श्वेतपत्रिका काढली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारले की आदर्श घोटाळ्यावाले कोण आहेत. नरेंद्र मोदी लोकसभेत असे बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशीच हे सन्मानीय (अशोक चव्हाण) त्यांना तुम्ही (जनतेने) पोसून ठेवलेलं होतं. ते फक्त तुमच्यामुळे (जनतेमुळे) मोठे झाले आणि तुम्हाला गरीब करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक आहे. ते (अशोक चव्हाण) सत्तेसाठी तिकडे (भाजपात) गेले. मी जनतेसाठी आणि या देशाच्या लोकशाहीसाठी आमदारकी, खासदारकी सोडून आलो. ते माझ्यावर सातत्याने टीका करतात. ते म्हणतात की, प्रदेशाचं (महाराष्ट्रातील) काँग्रेसचं नेतृत्व कमजोर आहे. त्यामुळे मी इकडे (भाजपात) आलो. आता नाचता येत नाही म्हणून अंगण वाकडं”, असा टोला नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना नाव न घेता लगावला.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”

अशोक चव्हाण काय म्हणाले?

“नाना पटोले यांनी भरपूर नाच केला आहे. मला कुठलाही नाच करण्याची सवय नाही. नाना पटोले आधी काँग्रेसमधून भाजपात गेले. त्यानंतर भाजपामधून पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे त्यांचा नाच किती आहे हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांवर काही टीका करण्यापेक्षा स्वत:चा नाच कसा झाला हे लोकांना सांगावं”, अशा खोचक शब्दात टीका करत अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले.