संगमनेर : शासनाने करोना संदर्भात जाहीर केलेल्या नव्या नियमावलीमध्ये अहमदनगर जिल्ह्यचा पहिल्या स्तरात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यतील टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले. असे असले तरी करोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोणताही निष्काळजीपणा नको. सूचनांचे पालन करा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

मंत्री थोरात यांनी संगमनेरमध्ये अधिकाऱ्यांसमवेत करोना स्थितीचा आढावा घेतला. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने, मुख्याधिकारी सचिन बांगर, तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश घोलप, डॉ. राजकुमार जऱ्हाड आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. प्रांताधिकारी डॉ मंगरुळे यांनी तालुक्यातील करोना स्थिती मंत्र्यांसमोर स्पष्ट केली.

मंत्री थोरात म्हणाले, विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यात रुग्णसंख्या कमी होत आहे, ही आनंदाची गोष्ट असली तरी टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर होणारी गर्दी चिंतादायक आहे. करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञांच्या मते तिसरी लाट देखील येण्याची शक्यता असल्याने शासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. कोणाला लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. लक्षणे असणाऱ्यांचे विलगीकरण करा. संपर्क शोध आणि उपचार या त्रिसूत्रीचा वापर करून जास्तीत जास्त तपासणी करा. आमदार तांबे म्हणाले, संगमनेर शहर आणि तालुक्यातील अनेक छोटय़ा-मोठय़ा गावांमध्ये होणारी गर्दी चिंताजनक आहे. करोनाच्या येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेस आपणच जबाबदार असू. त्यामुळे करोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या नियमांचे सर्वानी पालन करणे आवश्यक आहे.