अहमदनगर जिल्ह्य़ातील जवखेडे येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे  सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनास हिंसक वळण लागल्याने मुख्य रस्त्यावर काही काळ तणाव निर्माण झाला. काही कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू केल्याने रस्त्याच्या दुतुर्फा असलेल्या सुमारे २० दुकानांचे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील बाजारपेठ बंद होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा मार्गस्थ होत असताना काही कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेजवळील गादी भांडारवर अचानक दगडफेक सुरू केल्यानी दुकानदारांसह नागरिकांची धावपळ उडाली. त्यानंतर टॉवर चौक, पंचवटी हॉटेल, बेंडाळे कॉलेजजवळील दुकाने अशा तब्बल २० ठिकाणी दगडफेक करून दुकानांसह रुग्णवाहिका व इतर वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामुळे तासभर वाहतूक खोळंबली. संतप्त आंदोलकांना शांत करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली. पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याचा फटका व्यापाऱ्यांसह नागरिकांना बसला. दिवसभर बहुतांश दुकाने बंद होती.