सांगली : सलग पडत असलेल्या परतीच्या पावसाने फळछाटणी झालेल्या द्राक्ष बागावर दावण्या या बुरशीजन्य रोगाचा हल्ला झाला असून काढणीला आलेले सोयाबीन, भाजीपाला पाणी साचल्याने हातचे गेले आहे. परतीच्या पावसाने वाळवा व शिराळा तालुक्याला झोडपून काढले असून उसाच्या फडासह सर्वच उभे पिके पाण्यात आहे.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात आंधळी नक्षत्राच्या नावाप्रमाणे पाऊस पडत आहे. ऑक्टोबर महिन्यात उन्हाची तीव्रता अपेक्षित असताना पहाटेपासून पावसाची उघडझाप सुरू राहते. दिवसभर ढगाळ हवामान राहिल्याने पिकांनाही नुकसानकारक ठरत आहे. उसासह काढणीला आलेल्या सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, उडीद पिकामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने काढणीसाठी संधीच मिळेना झाली असून पावसाने सोयाबीनच्या शेंगा जागेवर फुटत आहेत. रब्बी हंगामाची पेरणीही करण्यासाठी घात मिळेना झाली आहे.

काही द्राक्ष बागांच्या छाटण्या पूर्ण झाल्या असून या बागेतील द्राक्ष घड पोंगा अवस्थेत आहे, तर काही बागामध्ये कळी अवस्थेत आहेत. सततच्या पावसाने दावण्या या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. बागेच्या एखाद्या कोपऱ्यातील पानावर दिसणारा दावण्या रोग २४ तासांत सर्व बागेत पसरू शकतो, तर ४८ तासांत कोवळय़ा घडावर आक्रमण होऊन संपूर्ण पीक नष्ट होऊ शकते. या रोगाला आळा घालण्यासाठी महागडी औषधे फवारली, तरी पावसाने उपयोग शून्य ठरत असल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तालुका पातळीवर नोंदला गेलेला पाऊस असा – मिरज १०.८, जत ६, विटा ३.९, वाळवा ५६.५, तासगाव ५.८, शिराळा ५९.८, आटपाडी ०.२, कवठेमहांकाळ ४.५, पलूस १४.६ आणि कडेगाव १०  मिलीमीटर.