कराड : लोकसभेच्या मुंबई उत्तर पश्चिम मध्य मतदारसंघाच्या मतमोजणीत गैरप्रकाराचा आरोप होत आहे. तरी मतमोजणीवेळी तिथे अनधिकृतपणे आणलेल्या भ्रमणध्वनीद्वारे मतयंत्र प्रणालीला हॅक केले गेले का? मताची अदलाबदली करण्यात आली का? असे प्रश्न उपस्थित होत असल्याने या गंभीर प्रकारावर निवडणूक आयोगाने सविस्तर निवेदन करावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

केंद्रावर भ्रमणध्वनी संच!

मुंबई उत्तर पश्चिम मध्य मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर अनधिकृतपणे भ्रमणध्वनी संच (मोबाईल फोन) तिथे आणू दिले गेले. ते शिवसेना शिंदे गटाच्या अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या जवळच्या नातेवाईकाकडे होते. त्या भ्रमणध्वनींचा उपयोग बाहेर संदेश पाठवण्याकरिता आणि बाहेरून संदेश येण्याकरिता होत होता तसेच हे भ्रमणध्वनी मतयंत्र (ईव्हीएम) उघडण्यासाठी ओटीपी जनरेट करण्याकरिता वापरल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – सोलापूर : उजनी धरणात दहा दिवसांत दहा टक्के वधारला पाणीसाठा

एफआरआय १० दिवसांनी

मतमोजणीच्या ठिकाणी हा प्रकार चार जूनला घडला आणि दहा दिवसानंतर १४ जूनला पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआरआय) दाखल केला असून, तो गुप्त ठेवण्यात आला आहे. त्याची प्रतही तक्रारकर्त्यांना देण्यात आली नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

गंभीर प्रश्न निर्माण झालेत

आम्ही पहिल्यांदा ऐकतोय की कुठल्याही भ्रमणध्वनी संचावर इलेक्ट्रॉनिक मशीन उघडण्याचा ओटीपी जनरेट होतो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्लीटी ट्रान्समिटेट पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हिस वोटर ही प्रणाली आहे. या प्रणालीकेबद्दल सुद्धा पहिल्यांदाच ऐकतोय. आणि त्या मतमोजणी केंद्रावर या प्रणालीला हॅक केले गेले का? मतांची अदलाबदली करण्यात आली का? तसेच अमोल किर्तीकारांचा पराभव फक्त ४८ मतांनी जाहीर केला गेला. पण, त्या आधीच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये किर्तीकार आघाडीवर होते. म्हणजे अनेक गंभीर प्रश्न या प्रकरणातून निर्माण होतात. तरी निवडणूक आयोगाने ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन याबद्दल सविस्तर निवेदन केले पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे चव्हाण म्हणाले.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? प्रताप पाटील चिखलीकरांनी सांगितली तीन कारणं; म्हणाले, “राज्यात जो फॅक्टर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधकांची बैठक बोलवावी

भारतापुरताच आज हा प्रश्न मर्यादित नाही त्यावर जगातही चर्चा सुरू झालेली आहे. एका प्रसिद्ध तज्ज्ञांनी ट्विट करून कुठलेही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक होवू शकते असे म्हटले आहे. त्याला राजीव चंद्रशेखर यांनी उत्तर दिले असले, तरी अशा प्रकारे चर्चा करण्यापेक्षा विरोधी पक्षांच्या नेत्यांची निवडणूक आयोगाने बैठक बोलावली पाहिजे, सगळ्या यंत्रणेवर पुन्हा कसा विश्वास प्रस्थापित होईल याचा प्रयत्न केला पाहिजे अशीही मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.