देशभरात राज्यसभेच्या रिक्त जागांवर येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. एकूण ५६ जागांसाठी मतदान होणार असून यापैकी सहा जागा महाराष्ट्रातील आहेत. शिंदे गट शिवसेनेतून आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रातील सहा जागांचे चित्र कसे असेल? याची उत्सुकता अनेकांना आहे. तसेच राज्यसभेवर ज्यांना उमेदवारी दिली जाईल, त्यातून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांचा अंदाज बांधला जातो. दरम्यान भाजपाकडून राज्यसभेवर कोणाला पाठविले जाणार? याचीही चर्चा जोरात होत आहे. ही चर्चा होत असताना भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ६ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीमुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतले जाणार का? या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली होती का? याबद्दल माध्यमांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. “पंकजा मुंडे आणि माझी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते. पण आमच्या भेटीत राज्यसभेच्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यसभेत कोण जाणार? याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात. पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचे की आणखी कोणते पद द्यायचे हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“…तर भाजपा महाराष्ट्रात लोकसभेच्या १४८ जागा जिंकू शकेल”, ठाकरे गटाचा टोला; अजित पवारांचा केला उल्लेख!

विधानसभेत सध्याचे संख्याबळ पाहता. भाजपाला तीन जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला एक जागा मिळू शकते. उरलेल्या एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शखतो. मविआला दुसरी जागा निवडून आणायची असेल तर त्यांना आणखी १५ मतांची गरज लागेल. भाजपाला जर चौथी जागा निवडून आणायची असेल तर त्यांना शिंदे गट आणि महाविकास आघाडीमधील काही मतांची गरज भासेल.

राज्यसभेतील मोदींच्या भाषणावर मल्लिकार्जुन खरगेंचं चोख प्रत्युत्तर; सांगितला NDA चा फुल फॉर्म!

महाराष्ट्रातील कार्यकाळ संपणारे सहा खासदार कोण?

  • प्रकाश जावडेकर, (भाजपा)
  • व्ही. मुरलीधरन, (भाजपा)
  • नारायण राणे, (भाजपा)
  • अनिल देसाई, (शिवसेना उबाठा)
  • वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
  • कुमार केतकर, काँग्रेस

या राज्यात होणार राज्यसभा निवडणुका

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतून ५६ खासदार राज्यसभेत जाणार आहेत.

मोदींनाच निवडण्याची लोकांची मानसिकता

टाईम्स नाऊ-मॅट्रीझचा नवा सर्व्हे समोर आला असून लोकसभेत एनडीएला महाराष्ट्रात ३९ जागा मिळतील, असा अंदाज या सर्व्हेने व्यक्त केला आहे. या सर्व्हेबाबतचा प्रश्न फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले की, सर्व्हे काहीही आले तरी लोकांची मानसिकता मोदींसह जाण्याची बनली आहे. लोकांनी ठरवलं आहे की, मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं. त्यामुळे मोदीजी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाला जनता निवडून देईल. गतवेळेपेक्षा आमच्या अधिक जागा निवडून येतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis reaction on pankaja munde rajya sabha candidature kvg