रत्नागिरी : राज्यात सत्तेमध्ये भागीदार असलेले भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला बेबनाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात चव्हाट्यावर आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवृत्तीचा सल्ला देणारे बॅनर बुधवारी वेंगुर्ले तालुक्यात ठिकठिकाणी झळकले होते. पोलिसांनी ते तत्परतेने काढून टाकले असले तरी प्रसारमाध्यमांमधून त्याचा बोभाटा झाल्याने महायुतीतील बेबनाव उघड झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘मागची दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी’, मोदींच्या तिसऱ्या टर्मबद्दल फडणवीस म्हणाले…

आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे इच्छुक असलेले ‘टिल्लू-पिल्लू’ घाबरल्याची प्रतिक्रिया केसरकरांनी दिली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण, परूळे, भोगवे परिसरात अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर केसरकरांना उद्देशून अस्सल मालवणी भाषेत म्हटले होते की, ‘भाई आता खराच पुरे झाला, थांबा आता..!! पाच वर्षांत जसा आमका तोंड दाखवक नाय तसे हेच्या पुढे येव नकात आता कोपरापासून हात सोडून सांगतवं तुमका…’ दुसऱ्या एका फलकामध्ये ‘मागच्या निवडणुकीत दोन हजार पोरा-पोरींका नोकरी देतालास असा सांगितलं, पाच वर्षांत एकाही माणसाक नोकरी काय लागाक नाय, पण असले एक एक गजाली सांगून आमची मता मात्र घेतलास,’ असा चिमटा काढण्यात आला आहे. ‘तुम्ही हाऊसबोट, वॉटर स्पोर्ट्स त्याचबरोबर स्थानिकांना हॉटेल, पालक अनुदान पर्यटनातून रोजगार अशा गोष्टी सांगितल्या होत्या. आम्ही खुश झालो होतो. त्यानंतर मतं घातली, परंतु तुमची हाऊस बोट काय आमच्या दर्यात पोचाक नाय,’ असा मजकूर एका बॅनरवर होता.

हेही वाचा >>> मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय

या बॅनरबाजीचे खापर केसरकर यांनी महायुतीतील काही नेत्यांवर नाव न घेता फोडले. मात्र त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

राजन तेलींवर रोख?

केसरकरांचा रोख भाजपाचे विधानसभा निवडणूक क्षेत्र प्रमुख व माजी आमदार राजन तेली यांच्यावर असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत केसरकरांनी त्यांचा सुमारे १५ हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे तेलींशी त्यांचे जुने राजकीय वैर आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करीत असल्यामुळे विधानसभेसाठीही भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar s banner with retirement suggestions text appeared at various places in sindhudurg at vengurle taluka zws
First published on: 22-02-2024 at 03:07 IST