लातूर : उदगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या अपघातांचे प्रमाण आणि गंभीर गुन्ह्यांत वाढ होत असल्याने वरिष्ठांची खप्पामर्जी होऊ नये म्हणून बोकडाचा बळी देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलीस ठाण्यातील हा प्रकार चिंताजनक असल्याची प्रक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, काही कर्मचाऱ्यांना बढती मिळाल्याने ‘पार्टी’ केल्याचा अजब खुलासा पोलिसांनी केला आहे.  उदगीर ठाण्याच्या प्रवेशद्वारावर बोकड व कसाई आणून बळी देण्याचा प्रकार १० दिवसांपूर्वी घडला. दारात बोकड कापल्याचे छायाचित्र समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकाराची अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा >>>शरद पवार गटाकडून तीव्र निदर्शने, राष्ट्रवादी काँग्रेस भवनावरील चिन्ह हटविले

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उदगीर पोलीस ठाण्यात दाखल अपघात व गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण कमी होत नाही याबद्दल चिंता व्यक्त केली होती. यावर काही जणांनी बोकड कापण्याचा उपाय सांगितला व त्या अधिकाऱ्यांनी क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवली.  कसायाने पोलीस ठाण्याच्या दारात बोकड कापले. त्यानंतर एका फार्म हाऊसवर ताव मारण्यात आला. याप्रकरणी उदगीरचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना विचारले असता, ‘गटबाजीतून हा प्रकार झाला आहे. मी अतिशय कडक पद्धतीने गेले वर्षभर काम केल्यामुळे जाणीवपूर्वक कोणी तरी ही बातमी पसरवली. मी त्या दिवशी पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित नव्हतो’ असे सांगितले.

‘चौकशी करून योग्य ती कारवाई’

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की या प्रकाराची सविस्तर माहिती घेतली जात आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान, हा प्रकार चिंताजनक असून, त्यावर कारवाई व्हायला हवी, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी व्यक्त केले. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for action under abolition of superstitions act after goat sacrifice incident in udgir police station amy
First published on: 08-02-2024 at 03:58 IST