scorecardresearch

Premium

“विरोधकांचा स्वभाव पाहाता पुढच्या वेळी सुपारीपान…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, “लोकसभेत याहून वाईट…!”

फडणवीस म्हणतात, “काही बॅनर लागलेले आम्ही बघितले की दहाच दिवस अधिवेशन आहे. ज्यांनी नागपुरात…!”

devendra fadnavis marathi
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गुरुवारपासून नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे शासकीय चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका करताना विरोधकांनी अधिवेशनात खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता अधोरेखित केली. विरोधकांनंतर सत्ताधाऱ्यांचीही पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षांवर खोचक शब्दांत टीका केली. तसेच, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही फडणवीसांनी लक्ष्य केलं.

“आता विरोधकांसाठी सुपारीपान ठेवावं लागेल”

“आज विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातला. चहापान चर्चेसाठी होतं. पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहाता पुढच्या वेळी सुपारीपान ठेवावं लागेल. म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसतेय. आज त्यांच्या पत्रकार परिषदेत काही लोक झोपी गेले होते. तीन राज्यांत जसे झोपले, तसे पत्रकार परिषदेतही ते झोपी गेले होते. पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलंय का हा प्रश्न पडावा असं पत्र विरोधकांनी दिलं आहे”, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.

ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”
jitendra awhad sharad pawar
“…ती शरद पवारांची मोठी चूक”, अजित पवारांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “त्यांनी पक्षांतर्गत…”
Deepak Kesarkar allegation on Uddhav Thackeray
‘खोके म्हणणाऱ्यांनीच मंत्रिपदासाठी पैसे मागितले’, दीपक केसरकर यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
Allegation of pressure to join BJP Arvind Kejriwal claim
भाजपमध्ये प्रवेशासाठी दबावाचा आरोप; आम्ही झुकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा

“मराठवाडा, विदर्भाचे मुद्दे कुठे आहेत?”

“एकतर मला आश्चर्य वाटतं की नागपूरचं अधिवेशन विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी यासाठी होत असतं. पण विरोधी पक्षाच्या पत्रात विदर्भ, मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाही. त्यांना विदर्भ, मराठवाड्याचा विसर पडल्याचं या पत्रावरून दिसतंय. दुसरं राज्यात काय चाललंय याचं भानही त्यांना नाही. त्यांनी पत्रात कंत्राटी भरतीच्या जीआरचा विषय काढला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सहीनं निघालेला जीआर दीड महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी रद्द केला हेही ज्या विरोधी पक्षाला माहिती नाही त्या विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“अहवाल वाचायचा कसा, हे वडेट्टीवारांनी शिकून घ्यावं”

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना एनसीआरबीच्या अहवालावरून टोला लगावला. “वडेट्टीवारांनी एनसीआरबीच्या अहवालाचा हवाला दिला. तो अहवाल कसा वाचायचा, हेही कधीतरी शिकलं पाहिजे. लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र गुन्ह्यात दुसऱ्या स्थानी आहे वगैरे. पण ही वस्तुस्थिती नाही. लोकसंख्येच्या बाबतीत आपण देशात आठव्या क्रमांकावर आहोत. हत्येच्या बाबतीत आपण १७व्या क्रमांकावर आहे. महिलांविरोधी गुन्ह्यांत आपण सातव्या स्थानी आहोत. बलात्काराच्या गुन्ह्यात महाराष्ट्र १२व्या क्रमांकावर आहे. अपहरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे एनसीआरबीचा अहवाल कसा वाचला पाहिजे याबाबतीतलं प्रशिक्षण विरोधी पक्षाला देण्याची गरज आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लकच राहणार नाही कारण..”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत

“ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही…”

यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेत खोचक टीका केली. “काही बॅनर लागलेले आम्ही बघितले की दहाच दिवस अधिवेशन आहे. ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही, ते सांगतायत दहाच दिवस अधिवेशन. त्यांना माझा पहिला प्रश्न आहे, आम्ही रोज म्हणायचो की नागपुरात अधिवेशन घ्या. पण तेव्हा मध्ये कोविड यायचा. त्यामुळे विरोधकांनी आधी आरश्यात पाहिलं पाहिजे, त्यानंतर बोललं पाहिजे. सर्व प्रकारच्या चर्चांसाठी आम्ही तयार आहोत”, असं फडणवीस म्हणाले.

“…तर लोकसभेत विरोधकांचं याहून वाईट पानिपत”

“तीन राज्यांत झालेल्या पराभवामुळे विरोधी पक्ष काहीतरी आत्मपरीक्षण करेल. नाहीतर इव्हीएममुळे जिंकले, आता देशात दक्षिण विरुद्ध उत्तर भारत होतंय असं समाधान जर त्यांनी करून घेतलं तर याहीपेक्षा वाईट पानिपत त्यांचं लोकसभा निवडणुकीत होईल”, असा दावाही फडणवीसांनी केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis mocks vijay wadettiwar congress opposition before assembly session pmw

First published on: 06-12-2023 at 19:10 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×