Uddhav Thackeray’s Public Meeting in Nashik: आज नाशिकच्या पदाधिकारी मेळाव्यानंतर झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपावर कडाडून टीका केली. इतकंच नाही तर माणसांना वापरा आणि फेका ही भाजपाची नीती आहे. त्यांना मित्र पक्षही नकोसे झाले आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान याच्याकडून प्रचार करुन घेतला आणि त्यांना मामा बनवलं. देवेंद्र फडणवीसांचा वापर केला आणि फेकून दिलं. मिंध्यांचाही वापर करुन फेकतील अशीही टीका त्यांनी केली. तसंच अमित शाह यांनी २०१९ मध्ये दिलेलं वचन पाळलं नाही ते पाळलं असतं तर आज संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठिशी असती आणि मोदींना महाराष्ट्राच्या वाऱ्या कराव्या लागल्या नसत्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत..

“आज मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं त्यांचं म्हणणं असेल तर २०१४ मध्ये शिवसेनेशी भाजपाने युती का तोडली होती? मे महिन्यापर्यंत आ गले लग जा असं होतं. मी दिल्लीत होतो. त्यानंतर जून ते ऑक्टोबर या कालावधीत काय घडलं? आम्ही काय धर्मांतर केलं की तुम्ही शिवसेनेशी युती तोडली? भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये आपल्याशी युती तुटली आणि ६३ आमदार निवडून आणले. २०१४ मध्ये दिल्लीत अशी चर्चा होती की आता बाळासाहेब राहिले नाहीत. त्यामुळे हा विचार चालला होता की उद्धव एकटा काय करणार. आता वेळ आली आहे शिवसेना संपवा. असं मला एका व्यक्तीने सांगितलं. मात्र ती व्यक्ती म्हणाली तुझे ६३ आमदार आले आता दिल्ली तुला घाबरते.”

तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते..

“मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन तुम्हाला आजही सांगतो. २०१९ मध्ये अमित शाह यांनी मला जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी मोडलं. वचन मोडूनही हे स्वतःला मोडूनही हे रामाचं नाव घेतात. पण आज तुम्हाला सांगतो जर अमित शाह यांनी मला दिलेलं वचन पाळलं असतं तर देवेंद्र फडणवीस आज जे पाव मुख्यमंत्री आहेत ते अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले असते. काय फरक पडला असता? जी काही फोडाफोडी केली ती न करता संपूर्ण शिवसेनेची ताकद तुमच्या बरोबर राहिली असती आणि आत्ता तुम्हाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी) जे वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं आहे ते यावं लागलं नसतं. कारण शिवसेनेने तुम्हाला पुन्हा सन्मानाने दिल्लीत पाठवलं असतं. पण तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता, पक्ष पळवता. त्यापेक्षा घातक म्हणजे ३७० कलम काढलं तरीही काश्मीरची परिस्थिती सुधारलेली नाही.” असं आज उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

‘एक विधान एक निशाण आणि एक प्रधान’ अशी यांची घोषणा आहे. एक निशाण म्हणजे भाजपाचा झेंडा आणि मोदी लिहितील ते विधान आणि एक प्रधानही भाजपाचाच. पण मला हे मंजूर नाही. एक विधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं असेल. एक निशाण म्हणजे तिरंगा असेल भाजपाचं फडकं नाही आणि एक प्रधान म्हणजे लोकांनी निवडून दिलेला तो तुमच्या ईव्हीएममधून आलेला नसेल असंही आज उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis would have been chief minister for two and a half years if amit shah had kept his promise said uddhav thackeray scj
First published on: 23-01-2024 at 20:40 IST