लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात पेटलेल्या वादाने नवं वळण घेतलं आहे. दोन्ही नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाच धर्मरावबाबा आत्राम यांनी दावा केला आहे की, “भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मी आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबई विमानतळावर बैठक झाली होती. त्या बैठकीत वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली होती. तसेच त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कुठे घ्यायचा यावरही त्या बैठकीत चर्चा झाली होती.” धर्मरावबाबा आत्राम यांच्या या गौप्यस्फोटानंतर भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, दोन वर्षांपूर्वी विजय वडेट्टीवार मंत्री असताना त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. विमानतळाच्या टर्मिनल १ वर ही चर्चा झाली. तिथे आम्ही तिघेजण भेटलो होतो. आमची ती भेट ठरवून झाली नव्हती. आम्ही वेगवेगळ्या दिशेने तिथे आलो आणि योगायोगाने आमची भेट झाली. त्यावेळी तिथे वडेट्टीवारांच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा झाली. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कुठे घ्यायचा, धर्मपुरीत घ्यायचा की गडचिरोलीत घ्यायचा यावरही तिथे चर्चा झाली होती.

दरम्यान, यावेळी आत्राम यांना प्रश्न विचारण्यात आला की, विजय वडेट्टीवार तेव्हा सत्तेत होते तरीदेखील ते भाजपात का येत होते? यावर धर्मरावबाबा म्हणाले, ते काही मला माहिती नाही. परंतु, ते मंत्री असतानाच ही चर्चा झाली होती. धर्मरावबाबा अत्राम एबीपी माझाशी बोलत होते. दरम्यान, अत्राम यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे ही वाचा >> रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजपाच्या नारायण राणेंना उमेदवारी; उदय सामंत म्हणाले, “आम्ही राजकारणातून…”

पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा काल (१७ एप्रिल) दुपारनंतर थंडावल्या. परंतु, यादरम्यान नेत्यांमध्ये उद्भवलेला वाद अद्याप शमलेला नाही. प्रचारादरम्यान वडेट्टीवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात टिकेची झोड उठवली होती. त्यानंतर आत्राम यांनीदेखील वडेट्टीवार लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत असा दावा करून खळबळ उडवून दिली. संपूर्ण प्रचारादरम्यान या दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला होता. यामुळे गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार सोडून या दोन नेत्यांचीच अधिक चर्चा पहायला मिळाली.