आसरअल्लीत मगरीसारखा मासा

वनखात्याकडून दखल

हिमालय आणि गंगेच्या पाण्यात आढळणारी पाणमांजराची जोडी अहेरी गावातील मोठय़ा तलावात दिसून आल्याने वन विभाग खडबडून जागा झाला आहे. वन्यजीव विभागाच्या लेखी पाणमांजर हा प्राणी वाघांएवढय़ाच संरक्षित श्रेणीत येत असल्याने वन विभागाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.
अहेरी तलावात मुंगूसासारखी दिसणारी पाणमांजर अर्थात, जलचरांची जोडी आणि आसरअल्ली येथील नदीत मगरीसारखा दिसणारा मासा आढळल्याने वन्यप्राणी, पक्षी, जलचरप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे, तर, दुसरीकडे या अनोख्या प्राण्याला व जलचराला जवळून बघणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. बर्फाच्छादित प्रदेशात आढळणारा, तसेच समुद्रप्राणी वाटणारा दुर्मिळ प्राणी अहेरीच्या तलावात आढळल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. मुंगूसासारखे दिसणाऱ्या त्या प्राण्यांची दोन पिल्ले आहेत. ते मुंगूस आहेत, हे समजून बंटी कुमरे यांनी त्या पिलांना तलावातून बाहेर काढले. त्यावेळी ती पिल्ले मुंगूसासारखी वाटत नसल्याचा संशय कुमरे यांना आला व त्या पिल्लांची बारकाईने पाहणी केली असता ती मुंगूसाची नाहीत यावर अनेकांचे एकमत झाले. ते दुर्मिळ प्राणी आहेत, असे मत अनेकांनी मांडताच त्या पिल्लांचे महत्त्व वाढले. इतकेच नव्हे, तर त्या पिल्लांना बघण्यासाठी अहेरीत गर्दी उसळली. केवळ गडचिरोलीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रिय असलेल्या हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पात त्या दोन्ही पिल्लांना तातडीने पाठविण्यात आले.
यासोबतच आणखी एका घटनेची वार्ता सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली या दुर्गम भागातून वाऱ्यासारखी पसरली. ही वार्ता होती मगरीसारखा दिसणारा मासा सापडल्याची. आसरअल्लीच्या नदीत मासेमारांच्या जाळात अडकलेला मासा मगरीसारखा दिसत होता. त्यामुळे नदीच्या काठावर मगरीची चर्चा सुरू झाली. ती मगर बघण्यासाठी सिरोंचा, आसरअल्ली परिसरातील आणि सोमनूरचे गावकरी घटनास्थळी गोळा झाले, पण त्यांना ती मगर वाटत नव्हती. तो मासाच होता. फक्त तो मगरीसारखा दिसत होता. त्या माशाचा जबडा चक्क मगरीसारखाच होता. त्याचे तोंड व दात जणू मगरीचेच. डोक्याचा भागाही तसाच, तर मागील भाग मात्र मासोळीसारखा होता. दुर्मिळ मासा हाती लागला तो कोळ्यांना. त्यानंतर तो मासा बघण्यासाठी गर्दी उसळली होती. या दुर्मिळ माशाबद्दल परिसरात कुतूहल व्यक्त केले जात आहे. जाणकारांनी ही सील माशांची पिल्ले असावी, असे मत व्यक्त केले आहे.