राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) शिवाजीराव अढळराव पाटील यांचं स्वागत करणार असेल तर मी माझा निर्णय घेईन, असं वक्तव्य अजित पवार गटातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे. शिवाजीराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाच्या चर्चेवर दिलीप मोहिते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजीराज अजित पवार गटात प्रवेश करतील आणि त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. यावर शिवाजीरावांचे राजकीय विरोधक दिलीप मोहितेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहिते-पाटील म्हणाले, मी तब्बल २० वर्षे त्यांच्याबरोबर संघर्ष केला आहे. आता अशा प्रकारचं राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील हे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. त्यांना पून्हा एकदा शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. परंतु, महायुतीत शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. शिरूरमधून उमेदवारी मिळावी यासाठी शिवाजीराव अढळराव पाटील अजित पवार गटात जाण्यास तयार असल्याची चर्चा आहे. यावर शिवाजीरावांचे राजकीय विरोधक दिलीप मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदार मोहिते पाटील यांनी काही वेळापूर्वी विधान भवनाबाहेर टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की शिवाजीराज अढळराव पाटील अजित पवार गटात आले तर तुम्ही त्यांचं स्वागत करणार का? त्यावर मोहिते-पाटील म्हणाले, ही केवळ चर्चा आहे.

दिलीप मोहिते पाटील म्हणाले, त्यांचं (शिवाजीराव अढळराव पाटील) स्वागत करायचं की नाही हा जर-तरचा भाग आहे. आम्ही आयुष्यभर त्यांना विरोध केला आहे. त्यामुळे मी राजकारण करण्यापेक्षा घरी बसेन. राजकारण हे तत्वाकरता व्हावं. आयाराम गयारामांचं राजकारण झालं तर राजकारणाला काही अर्थ उरणार नाही. तसं राजकारण मला करायचं नाही. त्यामुळे पक्ष त्यांचं स्वागत करणार असेल तर मी त्यावर काही बोलणार नाही. शेवटी पक्ष आणि पक्षप्रमुख त्यांचा निर्णय घेतील. परंतु, मी माझे वैयक्तिक निर्णय घेऊन. माझ्या वैयक्तिक जीवनात काय करायचं हा निर्णय घेईन. कारण तो माझा अधिकार आहे.

हे ही वाचा >> “मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, ज्यांनी मुला तुरुगात डांबण्यापर्यंत, मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेतल्या, प्रयत्न केले, त्यांच्याबरोबर काम करायचं किंवा नाही करायचं ते मी ठरवेन. तो सर्वस्वी माझा निर्णय असेल. मी माझ्या लोकांना विचारून ठरवेन. मी गेल्या २० वर्षांपासून त्यांच्याशी भांडतोय. त्यांनी ज्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्याबरोबर राजकारण केलं आहे ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. अशी वेळ आली तर मी घरी बसेन. त्यापलीकडे मी दुसरं काही करणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip mohite patil oppose shivajirao adhalarao patil to join ncp ajit pawar asc